इस्लामाबाद, 16 सप्टेंबर (हिं.स.)।भारतासोबत सुधारत चाललेल्या संबंधांच्या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असे काही केले आहे, ज्यामुळे भारत नाराज होऊ शकतो. वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ लवकरच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक करू शकतात.
या बैठकीत पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर हे देखील सहभागी असणार आहेत. ही भेट या महिन्याच्या अखेरीस न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रादरम्यान होण्याची शक्यता आहे. ही बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा जुलैमध्ये जाहीर करण्यात आलेल्या वक्त्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव होते, परंतु आता भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर करतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलामुळे जागतिक व्यासपीठावर भारताच्या भूमिका आणि महत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत, विशेषतः अशा वेळी जेव्हा अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात खास बैठक होणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यावर्षीच्या संयुक्त राष्ट्र महासभा सत्रात सहभागी होण्यासाठी अमेरिकेत पोहोचतील. माहितीनुसार, २५ सप्टेंबरला पंतप्रधान शरीफ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक करू शकतात. या बैठकीत पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरही उपस्थित असतील.
या बैठकीदरम्यान बहावलपूरवरील हल्ला, पाकिस्तानमधील पूरस्थिती, तसेच कतारवर इस्रायली हल्ल्यांच्या परिणामांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेच्या उच्चस्तरीय बैठकीत सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर अमेरिकेला जातील. संयुक्त राष्ट्र महासभेचे ८०वे सत्र ९ सप्टेंबरपासून सुरू झाले आहे आणि २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान चालेल.२३ सप्टेंबरला ब्राझीलचे नेते पहिले भाषण देतील, त्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जागतिक नेत्यांना संबोधित करतील. भारताकडून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर २७ सप्टेंबरला महासभेला संबोधित करतील.
जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीत पंतप्रधान मोदी २६ सप्टेंबर रोजी संबोधन करणार होते, मात्र यामध्ये आता बदल करून त्यांचे प्रतिनिधित्व परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडे देण्यात आले आहे.याव्यतिरिक्त, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष २६ सप्टेंबरला महासभेत भाषण देतील.२२ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्राच्या ८०व्या वर्धापनदिनानिमित्त एक विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे. त्याआधी, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात १८ जून २०२५ रोजी व्हाइट हाउसमध्ये एक बंद दरवाजामागे बैठक झाली होती. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याला अशा उच्च पातळीवर, कोणत्याही नागरी प्रतिनिधीशिवाय आमंत्रित करण्यात आले होते. ही भेट खूप चर्चेत आली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode