वॉशिंग्टन डीसी , 16 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिकेत दक्षिणपंथी टिप्पणीकार चार्ली किर्क यांच्या हत्येचा आनंद व्यक्त करणाऱ्या विदेशी नागरिकांचे व्हिसा रद्द केले जात आहेत. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी स्पष्ट केलं की, “अमेरिका अशा परदेशी लोकांना आपल्या देशात ठेवणार नाही जे आमच्या नागरिकांच्या मृत्यूचा जल्लोष करतात.”
एका मुलाखतीत रूबियो यांनी सांगितलं की, “अमेरिकेला अशा लोकांना देशात प्रवेश देऊ नये किंवा इथे राहण्याची परवानगी देऊ नये, जे अशा प्रकारच्या हत्यांचं समर्थन करतात किंवा त्याचा आनंद साजरा करतात.” त्यांनी पुढे म्हटलं, “आपण अशा लोकांना व्हिसा देऊ नये जे अमेरिका येऊन एखाद्या राजकीय व्यक्तीची हत्या, फाशी किंवा इतर हिंसक कृत्यांचा आनंद साजरा करतात. आणि जर ते आधीपासून इथे असतील, तर त्यांचा व्हिसा त्वरित रद्द करावा.”
रुबियो यांनी एक्सवर एक व्हिडिओ शेअर करत लिहिलं, “जे लोक आमच्या नागरिकांच्या मृत्यूचा जल्लोष करत आहेत, त्यांना अमेरिकेत स्थान नाही. व्हिसा रद्द केले जात आहेत. जर तुम्ही व्हिसावर येथे असाल आणि एखाद्या राजकीय व्यक्तीच्या सार्वजनिक हत्येवर आनंद व्यक्त करत असाल, तर निर्वासनासाठी तयार राहा. या देशात तुमचं स्वागत नाही.”
अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाच्या सहाय्यक सचिव ट्रिशा मॅकलॉफलिन यांनीही सांगितलं की, “अशा लोकांचे व्हिसा रद्द केले जावेत, जे अमेरिकन नागरिकांच्या हत्या महिमामंडित करतात.”
यापूर्वी, अमेरिकेचे उप परराष्ट्र सचिव क्रिस्टोफर लँडाउ यांनीही एक्सवर लिहिलं “मी हे स्पष्ट करू इच्छितो की जे परदेशी नागरिक हिंसा आणि द्वेष पसरवतात, त्यांचं आमच्या देशात स्वागत नाही.सोशल मीडियावर काही लोकांना या घटनेचं समर्थन करताना, तिची चेष्टा करताना किंवा योग्य ठरवताना पाहून मला तीव्र वाईट वाटतंय. “मी आमच्या सर्व दूतावासांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कृपया, जर तुम्हाला कोणत्याही विदेशी नागरिकाने अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्याचं दिसलं, तर ती माहिती मला द्या, जेणेकरून आपण अमेरिकन लोकांचे रक्षण करू शकू.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode