परभणी - अतिवृष्टीग्रस्तांना शिवसेनेचा दिलासा
परभणी, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। मुसळधार पावसामुळे परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही मिनिटांतच आलेल्या पुरामुळे उभी पिके वाहून गेली, जनावरे दगावली, घरांना तडे गेले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या गंभीर पर
अतिवृष्टीग्रस्तांना शिवसेनेचा दिलासा


परभणी, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। मुसळधार पावसामुळे परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही मिनिटांतच आलेल्या पुरामुळे उभी पिके वाहून गेली, जनावरे दगावली, घरांना तडे गेले तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले.

या गंभीर परिस्थितीत शिवसेनेने तातडीने मदतीचा हात पुढे केला. तालुक्यातील विविध अतिवृष्टीग्रस्त गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात तांदूळ, डाळ, तेल, पीठ यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे शेतकरी व नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली. त्यांनी नुकसानीचा आढावा घेत राज्य शासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाला तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. भरोसे यांनी स्पष्ट केले की, “शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी.”

परभणी तालुक्यातील झरी, टाकळी, जांब, पिंगळी, परभणी ग्रामीण परिसर या भागांमध्ये सर्वाधिक हानी झाल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी रस्ते व पूल वाहून गेल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या मदतकार्यात तालुकाप्रमुख प्रभाकर कदम, संदीप उर्फ पप्पू काका जाधव, महेश महाराज मठपती, सरपंच सुभाषराव गरुड, शिवाजी तरवटे, दत्तराव दौंड यांच्यासह शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला. परभणीच्या जनतेने या मदत उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला असून शेतकऱ्यांनी शिवसेनेचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande