जळगाव, 16 सप्टेंबर, (हिं.स.)शेतकऱ्यांच्या पिक विमा, कर्जमाफीसह अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या बुधवारी ( 17 सप्टेंबर) दुपारी 1 वाजता जळगाव येथे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यामोर्चाचे नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडु तसेच माजी खासदार उन्मेष पाटील हे करणार आहेत. विशेष म्हणजे हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा नसून, तो पूर्णपणे शेतकऱ्यांचा आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी आयोजित हा मोर्चा शांततामय पण ठाम आवाज देणारा ठरणार आहे. अमळनेर तालुक्यातून मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी 10 वाजता जळगावकडे रेल्वेने जाण्यासाठी सोयीची व्यवस्था असून, सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जळगाव गाठण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष संतोष पाटील यांनी केली आहे. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी काळ्या रंगाचे कपडे, फटका किंवा हाताला काळी पट्टी बांधून आपला निषेध नोंदवायचा आहे. हा मोर्चा शिवतीर्थ मैदानापासून सुरु होऊन जिल्हाधिकारी कार्यालय येथे याचा समारोप होणार आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, या मागणीसह हजारो शेतकरी एकाच आवाजात “चलो जळगाव” अशी घोषणा करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर