रत्नागिरी, 16 सप्टेंबर, (हिं. स.) | सोशल मीडियावरील एका व्हिडीओमुळे चिपळूण शहरात खळबळ उडाली होती. चोरीचा हा व्हिडीओ चिपळूणमधील नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन अनोळखी व्यक्तींनी पाणी मागण्यासाठी इमारतीत प्रवेश करून एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पसार झाल्याचा व्हिडीओ एका युट्यूब चॅनेलवर चिपळूणमधील प्रकार म्हणून दाखवण्यात आला. यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र या संदर्भात खात्री करून पाहिल्यानंतर समोर आले की, तो व्हिडीओ चिपळूणमधील नसून नाशिकमधील आहे. चिपळूण पोलिसांनी या प्रकरणात स्पष्ट केले आहे की, चिपळूण शहरात असा कोणताही प्रकार घडलेला नाही. संबंधित व्हिडीओ नाशिकमधील असल्याचे निश्चित झाले असून चिपळूणमध्ये तो गुन्हा घडल्याची बातमी ही दिशाभूल करणारी आणि खोटी आहे.
या घटनेनंतर नागरिकांमध्ये काही काळ गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या स्पष्टीकरणानंतर परिस्थिती स्पष्ट झाली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच खात्रीशिवाय सोशल मीडियावरील माहिती पुढे पाठवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी