अमरावती, 16 सप्टेंबर, (हिं. - स.)गावात दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्या आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे तळेगाव ठाकूरचे नागरिक संतप्त झाले आहेत. सतत खंडित होणारा वीजपुरवठा आणि ठप्प मोबाईल सेवा या गंभीर समस्यांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी (दि. १५ नोव्हेंबर २०२५) तिवसा तहसील कार्यालयात तहसीलदारांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
गावाचा वीजपुरवठा मोझरी फीडरवर असल्याने दिवसभरात अनेकदा वीज येते-जाते. त्यामुळे घरगुती उपकरणे, व्यवसाय, विद्यार्थी, शेतकरी आणि रोजंदारी करणारे सर्वजण हवालदिल झाले आहेत. वीज नसल्यामुळे गावातील मोबाईल टॉवर्सदेखील काम करत नाहीत, परिणामी मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प असते. यामुळे ऑनलाईन शिक्षण, बँक व्यवहार, आणि आपत्कालीन संपर्क पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.
वीजपुरवठा दिवसातून कित्येक वेळा खंडित होतो, पण बिल मात्र नेहमीप्रमाणे येते. मोबाईल टॉवर बंद पडल्याने नेटवर्कही राहत नाही. आमचे दैनंदिन आयुष्य अक्षरशः खोळंबले आहे.
सविता किरण उमप, गृहिणीसविता किरण उमप
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी