नाशिक, 16 सप्टेंबर, (हिं.स.)। : प्रभाग रचनांवरील सुनावणी घेतल्यानंतर शासनाने नियुक्त केलेले राज्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी राज्याच्या नगरविकास खात्याला शनिवारी (दि.13) अंतिम प्रस्ताव सादर केला होता .त्यानंतर नगरविकास विभागाकडून प्रभाग रचनेचा अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला आज मंगळ्वारी सादर करण्यात आला . दरम्यान राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना अधिसुचनेद्वारे प्रसिद्ध करणार असल्याने याकडे सर्वपक्षीयांचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी प्रभाग रचना प्रसिद्ध केल्यानंतर शहरातील विविध भागातून 91 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. या हकरतींवर गेल्या आठवडयात शासनाने नियुक्त केलेले संजय खंदारे, मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थित सुनावणी घेण्यात आली. दरम्यान यावेळी प्रभाग रचनेत चुकीच्या पद्धतीने वेगळा परिसर दुसऱ्या प्रभागाला जोडण्यात आल्याने यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचे आरोप काहींनी केले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 2017 प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग रचना असणार आहे. यातील 29 प्रभागात चार त दोन प्रभागात तीन सदस्य असे एकुण 122 जागांसाठे निवडणूक पार पडणार आहे. अंतिम प्रभाग रचना ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवडयातच प्रसिद्ध होणार असल्याने मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. दिवाळी नंतर काही दिवसांनी महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादुष्टीने सर्वपक्षीय माजी नगरसेवक व इच्छुक प्रभागात ॲक्टीव मोडवर आले आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीवेळी एक प्रभाग पस्तीस ते चाळीस हजार मतदारांचा होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत प्रभाग थेट पन्नास हजारांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच इच्छुकांचा निवडणूक लढवताना कस लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV