कॅलिफोर्निया विधिमंडळात दिवाळीला सार्वजनिक सुट्टी मान्यता देणारे विधेयक मंजूर
सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया), १७ सप्टेंबर (हिं.स.) - कॅलिफोर्निया विधिमंडळात गेल्या आठवड्यात दिवाळीला सार्वजनिक सुट्टी घोषित करणारे विधेयक क्र. २६८ मंजूर केले. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर, दिवाळी कॅलिफोर्निया राज्याच्या अधिकृत सुट्टीच्या य
कैलिफोर्निया चिनो हिल्स नोव्हेंबर 2020 दिवाळी रांगोळी फाईल फोटो


कॅलिफोर्निया विधिमंडळ


सॅक्रामेंटो (कॅलिफोर्निया), १७ सप्टेंबर (हिं.स.) - कॅलिफोर्निया विधिमंडळात गेल्या आठवड्यात दिवाळीला सार्वजनिक सुट्टी घोषित करणारे विधेयक क्र. २६८ मंजूर केले. त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर, दिवाळी कॅलिफोर्निया राज्याच्या अधिकृत सुट्टीच्या यादीत समाविष्ट केली जाईल. यामुळे पेनसिल्व्हेनिया आणि कनेक्टिकटनंतर दिवाळीला अधिकृत सुट्टी घोषित करणारे कॅलिफोर्निया हे तिसरे राज्य होऊ शकते.

लॉस एंजेलिस टाईम्समधील वृत्तानुसार, या विधेयकानुसार दिवाळीला संबंधित व्यवस्थापनाला कम्युनिटी कॉलेज आणि पब्लिक स्कूल बंद ठेवण्याचा अधिकार मिळेल. राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीला सुट्टी घेण्याचा पर्याय दिला जाईल. प्रस्तावित कायद्यानुसार, काही कम्युनिटी कॉलेजेस आणि पब्लिक स्कूलमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा दिली जाईल. कॅलिफोर्नियामध्ये सध्या ११ सरकारी सुट्ट्या आहेत, ज्यात मार्टिन लूथर किंग ज्युनियर डे, सीझर शावेज दिन, कामगार दिन आणि पूर्व सैनिक दिवस यांचा समावेश आहे.

या विधेयकाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी १२ ऑक्टोबरपूर्वी गव्हर्नर गेविन न्यूसम यांना स्वाक्षरी करावी लागेल. हे विधेयक सादर करणारे विधानसभा सदस्य ऐश कालरा (डेमोक्रॅट-सैन जोस) यांनी सांगितले की, दिवाळीला अधिकृत सरकारी सुट्टी घोषित केल्याने या सणाचे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व तर कळेलच, शिवाय प्रवासी भारतीय आणि इतर देशांतील लोकांना जगातील सर्वांत जुन्या धार्मिक सणांपैकी एकात सहभागी होण्याची संधी देखील मिळेल.

स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्टनुसार, दिवाळी पाच दिवस साजरी केली जाते. भारतात पारंपारिक रूपात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये हा सण साजरा केला जातो. परदेशात राहणारे भारतीयही मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी करतात.

हिंदू अमेरिकन फाउंडेशन (एचएएफ) नुसार, लोक घरे, व्यवसाय, मंदिरे आणि इतर सार्वजनिक ठिकाणी दिवे लावतात, जेणेकरून देवी लक्ष्मीला आशीर्वाद देण्यासाठी निमंत्रित करता येईल. दीपोत्सवत कुटुंब, मित्र आणि इतर समुदाय सदस्यांना भेटणे आणि भेटवस्तू किंवा मिठाईची देवाणघेवाण करणे हे देखील समाविष्ट आहे. यावर्षी, दिवाळीचा उत्सव २० ऑक्टोबरपासून सुरू होईल.

कॅलिफोर्नियामध्ये देशातील सर्वाधिक दक्षिण आशियाई लोकसंख्या आहे. लॉस एंजेलिसमध्ये कोणत्याही महानगर क्षेत्राच्या तुलनेत चौथ्या क्रमांकाची लोकसंख्या आहे. २०२४ मध्ये दिवाळीला अधिकृत सुट्टी जाहीर करणारे पेनसिल्व्हेनिया हे पहिले अमेरिकन राज्य ठरले. या वर्षी, कनेक्टिकट हे दिवाळीला अधिकृत सुट्टीच्या यादीत समाविष्ट करणारे दुसरे राज्य बनले. न्यू जर्सीच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना दिवाळीला सुट्टी दिली आहे. न्यूयॉर्क शहरात दिवाळीच्या दिवशी सरकारी शाळा बंद असतात. ही व्यवस्था २०२३ मध्ये लागू करण्यात आली आहे.

कॅलिफोर्नियामध्ये बऱ्याच काळापासून राहणाऱ्या भारतीयांनी दिवाळीला सुट्टी देण्याची मागणी केली होती. या विधेयकाच्या मंजुरीमुळे लोक आनंदी आहेत. एका हिंदू नेत्याने ही आनंदाची बातमी शेअर करताना सांगितले की, दिवाळी लवकरच कॅलिफोर्नियामध्ये अधिकृत सुट्टी बनू शकते. आता, राज्यपालांच्या मंजुरीची वाट पाहत आहे. आशा आहे की, लवकरच आपल्याला ही आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. हिंदू अमेरिकन फाउंडेशन (एचएएफ) आणि आमच्यासारख्या इतर धार्मिक संघटना गेल्या काही वर्षांपासून हे प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करत होतो. हिंदू स्वयंसेवक संघ (एचएसएस) आणि त्याच्या शाखा आपल्या समुदायासाठी किती अद्भुत काम करू शकते, हे समजून घेण्याची ही एक संधी आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande