पालघर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
देशभरात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महिलांच्या आरोग्य व पोषणासाठी केंद्र सरकारतर्फे “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” राबवले जाणार असून त्याची सुरुवात बुधवार रोजी पालघर येथे ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली.
खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांचे प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सुरू करण्यात आलेले हे अभियान “सेवा ही संकल्प, राष्ट्र प्रगती ही प्रेरणा” या भावनेतून राबवले जात आहे.
अभियानाच्या निमित्ताने महिलांसाठी रक्तदाब, मधुमेह, स्तन व गर्भाशय मुखाचा कर्करोग, एचआयव्ही, क्षयरोग, सिकल सेल, दंत तपासणी आदी विविध चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच अंगणवाडी स्तरावर पूरक आहार पाककृती प्रदर्शन, पोषण शपथ, स्थानिक आहाराचा प्रसार, ॲनिमिया जनजागृती, योग व मानसिक आरोग्य उपक्रम घेण्यात येतील.
“महिलांचे आरोग्य हेच सशक्त कुटुंब आणि मजबूत समाजाचा पाया आहे. त्यामुळे प्रत्येकाने या अभियानात सक्रिय सहभागी व्हावे.” असे प्रतिपादन यावेळी खासदार डॉ. सवरा यांनी केले.
आमदार गावित यांनी म्हटले की, “ग्रामीण भागातील महिलांना मोफत तपासण्या आणि पोषण सेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मोठा लाभ असून तो प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आवाहन केले की, “आरोग्य तपासण्या, पोषण सेवा आणि योजनांचा लाभ घेणे हीच खरी कुटुंबाची संपत्ती आहे. प्रत्येक महिला आणि बालकाने आपल्या जवळच्या आरोग्य केंद्र, अंगणवाडी किंवा आयुष्मान केंद्राशी संपर्क साधून या अभियानाचा फायदा नक्की घ्यावा.”
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व्यंकटराव हुंडेकर आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL