जळगाव, 17 सप्टेंबर, (हिं.स.) - भारतात दिवाळी आणि छठ पूजा दरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. अनेक जण नोकरीसह कामानिमित्त बाहेर गावी राहत असल्याने ते या सणासुदीला परिवारासह गावी जातात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते. प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने दिवाळी आणि छठ उत्सवाच्या हंगामात विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.पुणे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीच्या ठरणार्या काही रेल्वे गाड्यांना यापूर्वीच जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यानंतर आणखी तीन गाड्यांना दोन्ही स्थानकांवर थांबा मिळाला आहे. रेल्वेनं पुणे-दानापुर, पुणे-गाजीपुर सिटी-पुणे आणि नागपूर-हडपसर या तीन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष या गाड्यांना भुसावळ आणि जळगाव रेल्वे स्थानकांवर थांबा आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय झाली आहे. खरंतर जळगाव जिल्ह्यातून हजारो प्रवासी पुणे येथे नोकरी, व्यवसाय तसेच शिक्षणानिमित्त ये-जा करतात. जळगावहुन पुण्याला जाण्यासाठी फारच मर्यादित रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. यापूर्वी भुसावळ-पुणे दरम्यान सुरू करण्यात आलेली हुतात्मा एक्स्प्रेस प्रवाशांसाठी खूपच सोयीची ठरली होती. मात्र, ती गाडी भुसावळऐवजी आता अमरावतीहून सोडण्यात येते. इतर बऱ्याच लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या जळगावमार्गे पुणे जात असल्या, तरी त्यांना थांबा नाही. यातच आता आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगाव-भुसावळमार्गे काही विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे.
गर्दीच्या हंगामात प्रवाशांना त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या कायम फुल्ल असतात. त्यात बऱ्याच वेळा जळगाव आणि भुसावळच्या प्रवाशांना जागा मिळत नाही.या विशेष रेल्वे गाडीच्या दोन्ही बाजुने एकूण ३८ फेऱ्या होतील. ०१४३१ विशेष गाडी २६ सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आणि मंगळवारी पुणे येथून ०६.४० वाजता सुटेल, तर जळगावला दुपारी ३ वाजून २३ मिनिटाने व भुसावळ रेल्वे स्थानकावर दुपारी ३ वाजून ५५ मिनिटाने पोहोचेल. यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ०७.४० वाजता गाजीपुर सिटी स्थानकावर पोहोचेल. ०१४३२ विशेष गाडी २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर या कालाधीत प्रत्येक शनिवारी आणि बुधवारी गाजीपुर सिटीवरून रात्री १०.४० वाजता सुटेल आणि भुसावळला तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून २० मिनिटाने तर जळगावला ६ वाजून ५० मिनिटाने पोहोचेल. तर त्याच दिवशी दुपारी ०४.२० वाजता पुणे येथे पोहोचेल. या गाडीला देखील जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबा मंजूर आहे.या विशेष गाडीच्या दोन्ही बाजुने एकूण ४० फेऱ्या होतील. ०१४८१ विशेष रेल्वे गाडी २६ सप्टेंबर ते एक डिसेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी तसेच शुक्रवारी पुणे येथून रात्री ०७.५५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजून २८ मिनिटाने जळगावला नंतर सकाळी ५ वाजून ५५ मिनिटाने भुसावळ रेल्वे स्थानकावर पोहोचेल. तसेच तिसऱ्या दिवशी १०.०० वाजता दानापुर पोहोचेल. ०१४८२ विशेष गाडी २८ सप्टेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत प्रत्येक बुधवारी आणि रविवारी दानापुर येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून २० मिनिटाने भुसावळला नंतर जळगावला दुपारी ३ वाजून ४५ मिनिटाने पोहोचेल. यानंतर त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता पुणे येथे पोहोचेल.या विशेष रेल्वे गाडीच्या दोन्ही बाजुने एकूण ३६ फेऱ्या होतील. ०१२०१ विशेष गाडी २९ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक सोमवारी आणि गुरूवारी नागपूर येथून रात्री ०७.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ११.२५ वाजता हडपसर येथे पोहोचेल. ०१२०२ विशेष गाडी ३० सप्टेंबर ते २८ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी हडपसर येथून दुपारी ०३.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ही गाडी सुद्धा जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर