गडचिरोली, 17 सप्टेंबर, (हिं.स.) मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात गावातील प्रत्येक नागरिकाने सक्रीय सहभाग नोंदवत जास्तीत जास्त लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा विकास साधावा. ग्रामपंचायतींनी अभियानाच्या सर्व घटकांवर प्रभावीपणे कार्य करून पायाभूत सुविधा मजबूत करत सुशासन युक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.
'मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज' अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत दिभना येथे थेट प्रक्षेपणाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे प्रामुख्याने उपस्थित होते. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्हिडीओ संदेशद्वारे या अभियानाला शुभेच्छा देऊन राज्यातील ग्रामपंचायतींना सर्वाधिक आर्थिक लाभ मिळवून देणारे अभियान ठरणार असल्याचे सांगितले.
गावाचा सर्वांगीण विकास घडविणारे अभियान – खासदार डॉ. नामदेव किरसान
प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतून साकारलेले स्वच्छ भारत अभियान, लोकसहभाग व श्रमदानाचा वारसा पुढे नेत या अभियानातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येईल. शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गरजूं पर्यंत पोहोचविण्यास प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
*कोणताही घटक शासन योजनांपासून वंचित राहू नये – मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे*
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या अभियानातून शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे महत्व सांगितले व हे अभियान प्रभावीपणे राबवून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे आवाहन केले.
*ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार योजना*
मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात ग्रामपंचायत स्तरावर : प्रथम क्रमांक ₹15 लाख, द्वितीय ₹12 लाख, तृतीय ₹8 लाख, जिल्हास्तरावर : प्रथम क्रमांक ₹50 लाख, द्वितीय ₹30 लाख, तृतीय ₹20 लाख, विभागस्तरावर : प्रथम क्रमांक ₹1 कोटी, द्वितीय ₹80 लाख, तृतीय ₹60 लाख, राज्यस्तरावर : प्रथम क्रमांक ₹5 कोटी, द्वितीय ₹3 कोटी, तृतीय ₹2 कोटी
यावेळी ग्रामपंचायत दिभनाचे सरपंच रमेश गुरनुले, उपविभागीय अधिकारी रणजीत यादव, तहसिलदार शुभम पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पंकज भोयर, गटविकास अधिकारी अनिकेत पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी अमित साळवे, सहाय्यक गटविकास अधिकारी लिलाधर बेडके, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती पदाधिकारी, महिला बचत गट प्रतिनिधी, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद तसेच गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond