पालघर, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
राज्यात 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा” शुभारंभ बुधवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या अभियानाच्या राज्यस्तरीय उद्घाटनावेळी मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनवली गावात उपस्थित राहून 28 हजार ग्रामपंचायतींना उद्बोधन केले.
पालघर जिल्ह्यातही स्थानिक आमदार तसेच अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा शुभारंभ केला. आमदार विलास तरे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी चहाडे ग्रामपंचायत येथून उद्घाटन केले.
या अभियानाद्वारे ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवून लोकाभिमुख प्रशासन अधिक सक्षम करणे आणि गावोगाव शाश्वत विकास साधणे हा मुख्य उद्देश आहे. लोकाभिमुख प्रशासन, पाणीपुरवठा व्यवस्थापन, स्वच्छता, सौरऊर्जा, मनरेगा योजनेचे अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास आणि लोकसहभाग अशा महत्त्वाच्या क्षेत्रांवर ग्रामपंचायतींचे काम पाहिले जाणार आहे. गावात सीसीटीव्ही बसविणे, वेबसाईट तयार करणे, नागरिकांना दाखले सहज उपलब्ध करणे, कर वसुली, बचतगटांचे सबलीकरण, ॲनिमिया मुक्त गाव आणि श्रमदान संस्कृती निर्माण करणे यासारख्या उपक्रमांनाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
आमदार विलास तरे यांनी आवाहन करताना म्हटले की, “समृद्ध पंचायतराज अभियान गावोगाव विकासाचे नवे दालन खुले करणारे आहे. चहाडे ग्रामपंचायतीने दाखवलेला उत्साह व कामाची पद्धत पाहता नक्कीच विविध स्तरावरील बक्षिसे चहाडे ग्रामपंचायतीला मिळतील, असा विश्वास आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने केवळ बक्षीस मिळवण्यासाठीच नव्हे, तर गावाच्या भविष्यासाठी या अभियानात प्रामाणिकपणे काम करावे. पालघर जिल्हा एकजुटीने पुढे आला तर राज्यस्तरावर नक्कीच अव्वल ठरेल.”
या वेळी सरपंच विष्णू जाधव, ग्रामपंचायत अधिकारी लता चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजन पाटील, सहाय्यक गट विकास अधिकारी बापूराव नाळे आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. यावेळी उपस्थित ग्राम पंचायत सदस्य, माजी उपसरपंच अजय पाटील व इतर ग्रामस्थ यांनीही उत्साहाने सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL