पूरग्रस्त गावांमध्ये मदतकार्य सुरू करा - गिरीश महाजन
जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर व पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जा
पूरग्रस्त गावांमध्ये मदतकार्य सुरू करा - गिरीश महाजन


जळगाव, 17 सप्टेंबर (हिं.स.)

जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जामनेर व पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी, वाकडी, शेदूर्णी, तोंडापूर व नेरी या सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. नेरी बु. येथे २२ ते ४० घरांत पाणी शिरले असून पशुधनाची मोठी हानी झाली आहे. नेरी दिगर येथे १५ ते २० घरे व दुकाने पाण्याखाली गेली असून दोन कुटुंबांना शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. माळपिपरी येथे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले असून सुनसगाव खुर्द व सुनसगाव बु. या दोन्ही गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव, वरखेडी या मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शिंदाड, गहूले, वडगाव कडे, सातगाव, डोंगरी वाडी शेवाळे व वाणेगाव या सात गावांमध्ये नदी-नाल्यांना पूर आल्याने साधारण ५०० ते ६०० कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. शिंदाड व राजुरी भागात मोठ्या प्रमाणात शेती, घरे व पशुधनाचे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४०० पशुधनांची हानी झाली आहे.

या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईतील कॅबिनेट बैठक आवरून तातडीने जामनेर व पाचोरा तालुक्यात धाव घेतली. त्यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करून ग्रामस्थ व शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना धीर दिला. या वेळी आ. किशोर पाटील माजी आमदार दिलीप वाघ जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत सोनवणे आर डी पाटील स्थानिक प्रशासन व पदाधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी तातडीने शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली असून पुनर्वसन व मदतकार्य त्वरीत सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाकडून तातडीने अन्नधान्य, पाणी, वैद्यकीय सेवा आणि तात्पुरती निवारा व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande