नंदुरबार, 17 सप्टेंबर (हिं.स.) आजपासून 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत जिल्ह्यात महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सेवा पंधरवडा आयोजित केला जात असून या उपक्रमाच्या माध्यामातून शासनाच्या योजना घरोघरी पोहोचण्याचे आवाहन करताना त्यासाठी शुभेच्छा राज्याच्या सेवा हमी आयुक्त (नाशिक) चित्रा कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित सेवा पंधरवड्याचे उद्घाटन करताना बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उप जिल्हाधिकारी कल्पना ठुबे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) प्रमोद भामरे हे उपस्थित होते.
नागरिक व शासनातील दुवा अधिक मजबूत करणार डॉ. मित्ताली सेठी जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी स्पष्ट केले की, सेवा पंधरवड्याचा प्रमुख उद्देश शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत थेट पोहोचवणे, शासकीय सेवा सुलभ करणे आणि तक्रारींचे जलद निवारण करणे हा आहे. त्यांनी नमूद केले की, “या पंधरवड्यात नागरिक आणि शासन यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रत्येक गाव, प्रत्येक वस्तीपर्यंत प्रशासन पोहोचले पाहिजे, हीच खरी लोकसेवा आहे. सेवा पंधरवडा हा फक्त शासकीय कार्यक्रम नाही तर प्रत्येक नागरिकाने यात सहभागी होऊन आपले प्रश्न मांडण्याची, आपल्या हक्कांच्या सेवा मिळवण्याची संधी आहे. प्रत्येकाने आपला हक्क समजून घेऊन शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. प्रशासन आपल्यासाठी आहे, हे या पंधरवड्यात सर्वांनी अनुभवले पाहिजे. येणाऱ्या काळात काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यात दिशा प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्गम भागातील 50 गावांमध्ये घरपोच दाखले दिले जाणार आहेत. तसेच स्थलांतरित मजूरांसाठी एक हेल्पलाईन सोबत स्थानिक पातळीवर रोजगार तसेच कुटुंबियांसाठी असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. भूव्यवस्थापनासाठी एक कालमर्यादेत लोकांचे काम करण्यासाठीचे टूल विकसित केले जाणार आहे, ज्या माध्यमातून अर्जदाराने अर्ज केल्यानंतर तो कुठल्या ठिकाणी आहे तो ट्रॅक केला जाणार आहे. सुमारे 120 महाविद्यालयांमध्येच ई-सुविधा केंद्र विकसित करणे व लोकांना सेवा कशा मिळताहेत यावर आधारित अभिप्राय कक्ष निर्माण केला जाणार आहे. यावेळी सेवा पंधरवाडानिमित्त उपस्थितीत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना रेशन कार्ड, सातबारा, वनपट्टे दाखले, उत्पन्न दाखले, वारस नोंद दाखले, तगाई बोजा कमी दाखला असे विविध दाखल्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सेवा पंधरवडा विभागनिहाय उपक्रमांची रूपरेषा सेवा पंधरवड्यादरम्यान विविध विभागांतर्फे नागरिकाभिमुख कार्यक्रम आखण्यात आले आहेत… महसूल विभाग: दाखले वितरण, जमिनीच्या नोंदीतील दुरुस्ती, वारसा दाखल्यांचे निवारण, प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा. आरोग्य विभाग: दुर्गम पाड्यांमध्ये आरोग्य शिबिरे, सिकलसेल आजार जनजागृती, माता-बाल आरोग्य तपासणी, लसीकरण मोहीम. कृषी विभाग: नैसर्गिक शेती, ठिबक सिंचन, सेंद्रिय खत वापर, हवामान आधारित सल्ला, शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPOs) प्रोत्साहन. महिला व बालविकास विभाग: कुपोषण निर्मूलन मोहिमा, बचतगटांचे प्रदर्शन, महिला उद्योजकतेला चालना. शिक्षण विभाग: शाळा स्वच्छता अभियान, विद्यार्थी रॅली, डिजिटल शिक्षणविषयक उपक्रम. सामाजिक न्याय विभाग: दिव्यांगांसाठी कॅम्प, अपंग प्रमाणपत्र वाटप, शिष्यवृत्ती व लाभ योजनेचे मार्गदर्शन. ग्रामविकास व पंचायत राज: गावोगावी लोकसहभागातून ग्रामसभा, शासकीय योजनांचा आढावा, स्वच्छता उपक्रम.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर