नाशिक, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
- दसरा व दिवाळी सुरू होण्याच्या आधीच नाशिकमध्ये बनावट दुग्धजन्य पदार्थांचा साठा येण्यास सुरुवात झाली असून मिळालेल्या माहितीनुसार त्रिमूर्ती चौकामध्ये एका पेढीवरती छापा मारून 43 हजार रुपयांचा बनावट खवा आणि पनीर नष्ट करण्यात आले आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहयुक्त दि.ज्ञा. तांबोळी यांनी दिली आहे
अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक १२ सप्टेंबर रोजी सिडको त्रिमूर्ती चौक येथील मे. विराज एंटरप्रायजेस, पेढीमध्ये बनावट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन विभागाने या पेढीची तपासणी करुन पेढीमध्ये विक्रीसाठी आढळलेला संशयित पनीरचा १२९ किलो ग्रॅम किंमत रु. ३८ हजार ,७०० रुपये व खवा १८ किलो ग्रॅम किंमत रु. ५ हजार ०४० रुपये असा एकूण एकूण किंमत रु. ४३ हजार ,७४० रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने या साठ्यामधून पनीर व खवा या दोन अन्न पदार्थाचे अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेला संशयित पनीर व खव्याचा साठा हा नाशवंत असल्याने व ते परत खाण्याच्या उपयोगात येवू नये याकरीता त्यावर निळ टाकण्यात येवून सदरचा साठा अन्न व औषध प्रशासनाकडून महानगरपालिकेच्या घंटा गाडीत नष्ट करण्यात आला.
हा पनीर व खवा या अन्न पदार्थाचे नमुना विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल आज रोजी प्रलंबित आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधितावर अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार पुढील कारवाई घेण्यात येईल. हि कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, उमेश सूर्यवंशी , अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा गुप्तवार्ता यांनी मनिष सानप, सहायक आयुक्त, (अन्न) . दिनेश तांबोळी, सह आयुक्त (अन्न) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV