रत्नागिरी, 18 सप्टेंबर, (हिं. स.) : येथील एमआयडीसी भागात देहविक्रयाचा व्यवसाय करणाऱ्या नेपाळी महिलेला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अटक केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला एमआयडीसी येथे अनैतिक देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखचे एक पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार एक डमी गिऱ्हाईक पाठवून मिरजोळे एमआयडीसीतील प्लॉट ई-69 येथे छापा टाकण्यात आला. तेथे एक नेपाळी नागरिक महिला पुण्यातील दोन महिलांकरवी देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे आढळले. तिच्यावर अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
घटनास्थळी असलेल्या दोन महिलांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून देहविक्रीच्या व्यवसायातून मुक्तता करण्यात आली आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या समवेत
श्रीमती शबनम मुजावर, विजय आंबेकर, विवेक रसाळ, स्वाती राणे, पाटील, संदीप ओगले, दीपराज पाटील, भैरवनाथ सवाईराम, शीतल कांबळे, दत्ता कांबळे हे पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी