नंदुरबार, 18 सप्टेंबर (हिं.स.) तळोदा येथील उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ शिवाजी मोरे यास २ हजार ४०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई कार्यालयीन वेळेत करण्यात आली. लेखापाल शिवाजी मोरे यांनी बोरद येथील आश्रम शाळेतील तक्रारदाराच्या आईचे प्रोत्साहन भत्ता १ लाख ४३ हजार २५० रुपयाचे बील व सहा महिन्याची पगार स्लिप काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षिस म्हणून २ हजार ४०० रुपयाची लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ही बाब नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार म्हणून नोंदवली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला आणि लिपिकाला २ हजार ४०० रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपी लेखापाल भैरवनाथ मोरे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८चे कलम ७ प्रमाणे तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंध विभाग नंदुरबार पोलिस उपअधीक्षक प्रशांत भरते करीत आहेत. कोणीही लाचेची मागणी करत असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन नंदुरबार एसीबीकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर