पुणे, 18 सप्टेंबर (हिं.स.)। पुणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होत असताना प्रशासनाच्या स्तरावर तयारी सुरु झाली आहे. या सर्व प्रक्रियेत एकूण २४ हजार कर्मचाऱ्यांची गरज भासणार असल्याने निवडणूक शाखेकडून मनुष्यबळाची जुळवाजुळव सुरु झाली आहे. आतापर्यंत १९ हजार कर्मचाऱ्यांची माहिती संकलित झाली आहे.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांसह संपूर्ण शहराची नवीन प्रभाग रचना तयार झाली आहे. ही प्रभाग रचना ६ ऑक्टोबर पर्यंत अंतिम होणार आहे. यामध्ये ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने विभागीय आयुक्तांकडे १७ निवडणूक अधिकारी आणि तितकेच सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची मागणी केली आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ३ हजार ४३१ मतदान केंद्रे होती, पण आता नवीन मतदारांची नोंदणी व जास्त मतदान केंद्र तयार केले जाणार असल्याने ही संख्या ४ हजार ४९० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्र निश्चिती व सुविधा तपासण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना समन्वय अधिकारी म्हणून नेमले असून त्यांच्या अहवालावर निवडणूक विभाग अंतिम निर्णय घेणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु