वॉशिंग्टन, 19 सप्टेंबर (हिं.स.)।अमेरिका पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य तैनात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी (दि.१८) बगराम एअर बेसचा उल्लेख करत म्हटलं आहे की, “आपण ते परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.” ट्रम्प यांनी याला “ब्रेकिंग न्यूज” असंही म्हटलं.ब्रिटनच्या दौऱ्याच्या समारोपावर ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टॉर्मर यांच्या सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की, बगराममध्ये अमेरिकन उपस्थिती फार महत्त्वाची आहे, कारण ही जागा चीनच्या अतिशय जवळ आहे.
पत्रकार परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले, “आपण त्या बेसची मागणी करत आहोत कारण, जसं तुम्हाला माहीत आहे, चीन जिथे आपले अण्वस्त्र तयार करतो, त्या ठिकाणापासून ही जागा फक्त एका तासाच्या अंतरावर आहे.”
ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की, बगराम एअर बेस पुन्हा ताब्यात घेण्यामागे चीनशी वाढत्या संघर्षाची तयारी करणं हे मुख्य कारण आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी हेही संकेत दिले की, 2021 मध्ये तालिबानने सत्तेवर आल्यापासून तो आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय वैधतेचा अभाव, आंतरिक मतभेद आणि इतर दहशतवादी संघटनांपासून होणाऱ्या स्पर्धांशी झुंजतो आहे. अशा परिस्थितीत तालिबान अमेरिकन लष्कराला पुन्हा परत येण्याची परवानगी देऊ शकतो, असं ट्रम्प यांनी सूचित केलं.
सुमारे 4 वर्षांपूर्वी अमेरिकेने अचानक अफगाणिस्तानमधून आपले सैन्य काढून घेतले होते, आणि त्यानंतर तालिबानने बगराम एअर बेससह संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. अफगाणिस्तान हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकालीन युद्धभूमी राहिला आहे. अद्याप व्हाइट हाऊसने याबाबत स्पष्ट केलेलं नाही की तालिबान सरकार आणि अमेरिकेमध्ये पुन्हा कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाली आहे की नाही.
बगराम एअर बेस अफगाणिस्तानच्या परवान प्रांतात आहे.हा काबूलपासून सुमारे 47 किमी उत्तरेला आहे.या बेसवर 11,800 फूट लांबीचा रनवे आहे, जो बॉम्ब टाकणाऱ्या आणि मोठ्या मालवाहू विमानांच्या उड्डाणासाठी सक्षम आहे.काही काळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावाही केला होता की, बगराम एअर बेस चीनच्या ताब्यात गेला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode