सोलापूर, 2 सप्टेंबर (हिं.स.)क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने काढलेल्या परिपत्रकात, यंदाच्या 2025-26 या शैक्षणिक वर्षातील राज्यातील सर्व शालेय थ्रोबॉल स्पर्धा स्थगित झाल्या. राष्ट्रीय पातळीवर नियमांबाबत सुरू असलेल्या वादामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात दरवर्षी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर 92 खेळांच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. ज्यात थ्रोबॉलचाही समावेश आहे. मात्र, राष्ट्रीय शालेय थ्रोबॉल स्पर्धा यंदाच्या वर्षात स्पर्धा स्थगित केल्या असल्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने सांगितले आहे.तसेच 9-साईडऐवजी 7-साईड प्रकारात आयोजित करण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा वाद सुरू झाला.
सर्व स्तरांवर नियमांमध्ये एकसमानता आणण्यासाठी तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. राज्यात थ्रोबॉल स्पर्धा 7-साईड प्रकारात आयोजित करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यासाठी कायदेशीर सल्लागारांचे मार्गदर्शन घेतले जात आहे. या प्रक्रियेत नियमांमध्ये बदल करणे आणि सर्व स्तरांवर एकसारखेपणा आणण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे, लवकरच निर्णय अपेक्षित असला तरी, नेमका कालावधी अद्याप निश्चित नाही. पुढील सूचना मिळेपर्यंत खेळाडूंना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड