अफगाणिस्तानची पाकिस्तानवर १८ धावांनी मात
शारजाह, ३ सप्टेंबर (हिं.स.). शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत करण्याची किमया साधली. अफगाणिस्तानच्या विजयात इब्राहिम झद्रान (६५) आणि सिद्दिकुल्लाह अटल (६४) यांनी मोलाची भूमिका बजावली. या दोघांनीही शा
अफगाणिस्तानचा संघ


शारजाह, ३ सप्टेंबर (हिं.स.). शारजाह येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला १८ धावांनी पराभूत करण्याची किमया साधली.

अफगाणिस्तानच्या विजयात इब्राहिम झद्रान (६५) आणि सिद्दिकुल्लाह अटल (६४) यांनी मोलाची भूमिका बजावली. या दोघांनीही शानदार अर्धशतके झळकावली. त्यानंतर गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत पाकिस्तानच्या संघावर दबाव आणला. पाकिस्तानकडून फहीम अशरफ (४/२७) हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. पण त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. रहमानउल्लाह गुरबाज ८ धावा काढल्यानंतर सॅम अयुबचा बळी ठरला. त्यानंतर, अटल आणि इब्राहिमने डावाची सूत्रे हाती घेतली आणि अनेक शानदार फटके मारले. नवव्या षटकात दोघांनी ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. १४ व्या षटकात, अटलने सुफियान मुकीमविरुद्ध २० धावा काढून सामन्याचे चित्र बदलले. त्याच षटकात अटलने त्याचे दुसरे टी२० आंतरराष्ट्रीय अर्धशतक पूर्ण केले. दोघांमध्ये ११३ धावांची भागीदारी झाली.

अशरफने शानदार गोलंदाजी केली आणि इब्राहिम, उमरझाई आणि करीम जन्नतला बाद केले. पण मोहम्मद नबीने वेगवान खेळी करत अफगाणिस्तानला १६९/५ पर्यंत पोहोचवले.

लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. साहिबजादा फरहानने षटकार मारला. पण दुसऱ्या बाजूला सॅम अयुब पहिल्याच चेंडूवर फजलहक फारुकीचा बळी ठरला. फखर जमान आणि फरहानने धावगती वाढवली. पण दोघेही लवकरच बाद झाले. सलमान अली आघाच्या धावगतीमुळे पाकिस्तानवर दबाव वाढला.

यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी नियमित अंतराने विकेट घेतल्या. नूर अहमद आणि मोहम्मद नबीने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर रशीद खानने सलग दोन चेंडूंवर दोन विकेट्स घेत पाकिस्तानच्या आशा पूर्णपणे धुळीस मिळवल्या. शेवटी हरिस रौफने चार षटकार मारून चमक दाखवली. पण पाकिस्तान २० षटकांत फक्त १५१/९ धावा करू शकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande