इगतपुरी, 28 सप्टेंबर (हिं.स.)।
समृध्दी महामार्ग हा आपल्या राज्याचा जीवनवाहिनी मार्ग ठरत आहे. दररोज हजारो वाहने या महामार्गावरून प्रवास करतात. परंतु मोठ्या प्रमाणावर वाहने व वेगामुळे अनेकदा अपघात होतात. अपघात झाल्यावर पहिल्या काही मिनिटांना ज्याला आपण Golden Hour म्हणतो फार मोठे महत्त्व असते. जर योग्य उपचार तातडीने मिळाले, तर अनेक जीव वाचू शकतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचार प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज इगतपुरी येथे Association of Surgeons of India (ASI), Maharashtra State Road Development Corporation (MSRDC) आणि Nashik Surgical Society यांच्या वतीने आयोजित “Basic Life Support and Emergency Responder Training Course for Highway Employees” या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी स्वतः प्रथमोपचार प्रात्यक्षिकात सहभाग घेऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ.महेश मालू, एम.एस.आर.डी.सी विभागाचे मुख्य अभियंता एस. के.सुरवासे, डॉ.दिवाकर रेड्डी, डॉ.कैलास कमोद, डॉ.सचिन नाईक, डॉ.सतीश धारप यांच्यासह संघटनेचे देशभरातील प्रमुख डॉक्टर्स, अधिकारी, पदाधिकारी व महामार्ग कर्मचारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, आत्तापर्यंत आपण अनेकदा असे अनुभवले आहे की अपघातग्रस्त रुग्ण रुग्णालयात पोहोचण्याआधीच आपला जीव गमावतो. कारण घटनास्थळी आवश्यक ती प्राथमिक मदत मिळत नाही. याच पार्श्वभूमीवर हा उपक्रम म्हणजे खरोखरच जीव वाचविण्याचा, समाजसेवेचा आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घेण्याचा एक आदर्श प्रयत्न आहे. या प्रशिक्षणाद्वारे महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपघातग्रस्तांना त्वरित प्राथमिक उपचार कसे द्यावेत,जखमींच्या रक्तस्रावावर नियंत्रण कसे मिळवावे, श्वासोच्छ्वास बंद झाल्यास CPR कसे करावे, आणि रुग्णाला सुरक्षितरीत्या रुग्णालयात पोहोचवण्याची पद्धत काय असावी, याबाबतचे ज्ञान मिळणार आहे. हे ज्ञान म्हणजे फक्त प्रशिक्षण नसून, हे अनेक कुटुंबांच्या भविष्यासाठी नवी आशा देणारे साधन असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आपला देश हा जगातील रस्ते अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू होणाऱ्या देशांपैकी एक आहे. महाराष्ट्राचीही या यादीत दुर्दैवाने मोठी नोंद आहे. समृध्दी महामार्ग हा आपल्या राज्याचा अभिमान आहे. नागपूर ते मुंबई जोडणारा हा महामार्ग विकासाची नवी दारे उघडतो आहे. परंतु वेगामुळे आणि वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे येथे अपघातसुद्धा मोठ्या प्रमाणावर घडताना आपण पाहत आहोत. या महामार्गावर शासनाकडून आवश्यक त्या सोई सुविधा करण्यात येत आहे. मात्र या महागावरून प्रवास करताना काय काळजी घ्यायला हवी. प्रथमोपचार कसे द्यावे याबाबत माध्यमातून अधिक प्रसिद्धी देण्याची आवश्यकता आहे. त्यातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होईल असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV