कल्याण, 28 सप्टेंबर (हिं.स.)। विदर्भ व मराठवाड्यात पुराने थैमान घालून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या आसमानी संकटाच्या दुःखात सहभागी होत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते एक दिवस अन्नत्याग करून उपवास करणार आहेत. तसेच राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून निधी संकलित करून संघटनेच्या वतीने थेट बाधित गावांमध्ये जाऊन मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीला शनिवारी कल्याण (जि. ठाणे) येथील सेंचुरी रेयाॅन क्लब हाऊस येथे सुरुवात झाली.सेंच्युरी रेयाॅन ह्युमन रिसोर्स विभागाचे उपाध्यक्ष श्रीकांत गोरे यांच्या हस्ते पाण्यावर दिवा प्रज्वलित करून बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, राज्य प्रधान सचिव रुकसाना मुल्ला, डॉ. ठकसेन गोराणे, गजेंद्र सुरकार, विनायक सावळे, विजय परब, राज्य सरचिटणीस आरती नाईक, शहाजी भोसले, उत्तरेश्वर बिराजदार, सुधाकर काशीद, कृष्णांत कोरे तसेच ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. सुषमा बसवंत आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या बैठकीला राज्यातील ३० जिल्ह्यांमधून तब्बल २०० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सुरुवातीला राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी विदर्भ व मराठवाड्यातील पूरस्थितीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा मांडली. त्यांच्या वेदनेत सहभागी होण्यासाठी बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांनी एक वेळचे अन्नत्याग करून उपवास करण्याचा संकल्प केला. तसेच या अन्नत्यागातून वाचलेले पैसे व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे केलेल्या सहाय्यातून पूरग्रस्तांसाठी थेट मदत करण्याच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यासोबतच पूरग्रस्तांसाठी मानसिक आधार प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी दिवसभर झालेल्या या बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर सखोल चर्चा झाली. जिल्हानिहाय व विभागनिहाय अहवाल सादर करून कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन ठरवण्यात आले. आज, रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी या दोन दिवसीय राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप होणार आहे. सूत्रसंचालन जिल्हा प्रधान सचिव राजेश देवरुखकर यांनी केले. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी सुशीला मुंडे, मच्छिंद्रनाथ मुंडे,उत्तम जोगदंड,नंदकिशोर तळाशीलकर,ॲड.तृप्ती पाटील, मुकुंद देसाई, शरद लोखंडे, नितिन वानखेडे,दिवेंद्र मोरे, मंगल मोरे,भाग्यश्री भडांगे,गुलाब सूर्यवंशी,आदींनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर