पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। पालघर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रमगड, वाडा आणि वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत नदी, ओढे व पुलांवरून पाणी वाहत असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. खबरदारी म्हणून संबंधित ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
विक्रमगड पोलीस ठाणे क्षेत्र
देहार्जे नदीला पूर आल्याने शीळ गावातील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे देहार्जे–शीळ गाव दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच शेलपाडा–मालवाडा रस्त्यावर मोरीवरून तब्बल तीन फूट पाणी जात असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
वाडा पोलीस ठाणे क्षेत्र
वाडा कळंबे पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय देवघर–बिलोशी रस्ता, गोरे–भोईरपाडा पुल व जाले–बोर शेती पुल हे मार्गही पाण्याखाली गेले असून सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे. सदर भागात पोलिसांनी बंदोबस्त ठेवून नागरिकांना सुरक्षिततेचे आवाहन केले आहे.
वाणगाव पोलीस ठाणे क्षेत्र
कलौली–देदाळे येथे चिंचेचे मोठे झाड पडल्यामुळे चिंचणी–वाणगाव मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. झाड कापून मार्ग मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
इतर भागात परिस्थिती सामान्य
याशिवाय जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अद्याप नैसर्गिक आपत्तीची कोणतीही गंभीर माहिती प्राप्त झालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL