पालघर, 28 सप्टेंबर (हिं.स.)। डहाणू रेल्वे हद्दीत अमृतसर जाणाऱ्या रेल्वेमध्ये रविवारी २८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.२० वाजता तांत्रिक अडचण निर्माण झाली. वाणगाव व डहाणू स्थानकांदरम्यान झालेल्या या घटनेत गाडीचे काही डबे थोड्या वेळासाठी वेगळे झाले होते. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या कोच ए-३ व ए-२ (इंजिनपासून पाचवा व सहावा डबा) यांच्या जोडणीत झालेल्या बिघाडामुळे उद्भवली होती. तातडीने कारवाई करत प्रशासनाने ही अडचण तात्पुरती दूर केली आणि गाडी पुढे मार्गस्थ झाली. मात्र संजान स्थानकात पोहोचताच पुन्हा हीच समस्या दिसून आल्याने गाडी थांबवून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले.
तांत्रिक कर्मचाऱ्यांचे विशेष पथक घटनास्थळी बोलावून जोडणीची समस्या पूर्णपणे दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रवाशांना गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने समाजमाध्यमावर या घटनेची माहिती त्वरित प्रसिद्ध केली.
रेल्वे प्रशासनाच्या मते, ही समस्या लवकरच पूर्णपणे दूर होणार असून अमृतसर एक्सप्रेसचा प्रवास सुरळीतपणे सुरू राहील. या घटनेमुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम झालेला नाही. प्रवाशांना झालेल्या तात्पुरत्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने खेद व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL