सोलापूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। भारत सरकारच्या राजपत्र अधिसूचनेनुसार १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरातील अव्यवसायिक वाहनांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सवलत लागू करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांनी दिली. ही योजना कार, जीप, व्हॅन यांसारख्या अव्यवसायिक वाहनांसाठी लागू असून, वार्षिक टोल पासची किंमत ₹३,०००/- इतकी आहे. पासची वैधता एक वर्ष किंवा २०० एकेरी फेऱ्या यापैकी जे आधी पूर्ण होईल ते लागू राहील. हा पास राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध असून राज्य महामार्गावरील टोल प्लाझांसाठी अवैध राहील. वार्षिक टोल पास मिळवण्यासाठी तसेच त्याचे सक्रियता व नूतनीकरण राजमार्ग यात्रा मोबाईल ॲप व NHAI च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड