इगतपुरी, 3 सप्टेंबर (हिं.स.) : - रक्ताची उपलब्धता झाली नाही म्हणून अनेक गरजू रुग्णांचे अनमोल जीव गेले आहेत. बदलत्या काळात अपघातांचे प्रमाण वाढल्याने रोजच रक्ताची टंचाई भासू लागली आहे. अशा जीवघेण्या परिस्थितीमध्ये रक्त संकलन करणे म्हणजे खूपच मोठे पुण्याचे काम आहे. यामुळेच सध्या सुरु असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरीच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी अनेकांना जीवदान देणारे रक्त संकलन व्हावे म्हणून पोलीस ठाण्यातर्फे रक्तदान शिबीर यशस्वी करून दाखवले.
रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांना आपला मोलाचा प्राण गमवावा लागतो. यामुळे संपूर्ण कुटुंब उघडे पडून अवघड सामाजिक प्रश्न उभे राहतात. पोलिसांसुद्धा सामाजिक जाणीव असून लोकांचे प्राण वाचावे अशी सर्वांची सदभावना आहे. या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांनी आता पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेतून इगतपुरीत गणेशोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी सुद्धा करून त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस ठाण्यात या दोन्ही समाजोपयोगी उपजरामात इगतपुरी शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर, सामाजिक कार्यकर्ते वामन खोसकर, आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग आदींनी प्रतिसाद देऊन कार्यक्रमाला हजेरी लावली. नाशिक जिल्हाभरात कौतुक झालेल्या ह्या कार्यक्रमाचे आयोजन इगतपुरी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, कांचन भोजने, अमोल गायधनी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, शंकर तातडे, पोलीस हवालदार विनोद गोसावी, निलेश देवराज, महेंद्र गवळी, राहुल साळवे, प्रकाश कासार, इगतपुरी होमगार्ड व इतर अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV