बीजिंग, 4 सप्टेंबर (हिं.स.)।रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या एका वक्तव्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली आहे. बुधवारी (दि.३) चीन दौऱ्याच्या समाप्तीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुतिन म्हणाले की, आता “एकध्रुवीय जागतिक व्यवस्था” संपुष्टात यायला हवी. त्यांनी ठामपणे सांगितले की, आता अशा बहुध्रुवीय जागतिक व्यवस्थेची गरज आहे, जिथे कोणत्याही एका देशाचे वर्चस्व नसेल आणि सर्व राष्ट्रे समान हक्कांनी सहभागी होतील. पुतिन यांच्या या घोषणेमुळे अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या जागतिक वर्चस्वाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पुतिन यांनी अमेरिकेचे नाव न घेता म्हटले, “एकध्रुवीय जग अन्यायकारक आहे, हे स्पष्ट आहे. आम्ही आमचे संबंध या विचारावर आधारले आहेत की जग बहुध्रुवीय असावे, जिथे सर्व देश समान असावेत.” त्यांनी या नव्या व्यवस्थेत ब्रिक्स आणि एससीओ सारख्या संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले आणि स्पष्ट केले की हा बदल हळूहळू आकार घेत आहे. पुढे पुतिन म्हणाले, “ ब्रिक्स आणि एससीओ या संघटनांमध्ये कोणीही असे म्हणत नाही की या नव्या बहुध्रुवीय व्यवस्थेत कोणाचे तरी नवीन वर्चस्व असावे.” पुतिन यांनी भारत आणि चीनसारख्या आर्थिक महासत्तांचा उल्लेख करताना सांगितले की, “होय, भारत आणि चीनसारख्या मोठ्या अर्थव्यवस्था आहेत आणि आमचाही देश खरेदी क्षमतेच्या निकषावर जागतिक टॉप ४ मध्ये आहे. पण याचा अर्थ असा नाही की एखादा देश जागतिक राजकारण किंवा सुरक्षा क्षेत्रावर वर्चस्व गाजवू शकतो.” पुतिन यांच्या या वक्तव्याला युक्रेन युद्धानंतर पश्चिमी देशांनी लादलेल्या निर्बंधांशी आणि अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनसारख्या देशांवर लादलेल्या टॅरिफ्सशी जोडून पाहिले जात आहे. विशेषतः रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर लावण्यात आलेल्या २५% अतिरिक्त शुल्कासह एकूण टॅरिफ ५०% पर्यंत पोहोचल्यावर रशियाने एकध्रुवीय मानसिकतेवर टीका केली आहे. पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेचाही उल्लेख केला, जी एससीओ शिखर परिषदेनंतर हॉटेलपर्यंतच्या कार प्रवासादरम्यान झाली. पुतिन म्हणाले की, त्यांनी मोदींना अलास्का येथे डोनाल्ड ट्रम्पसोबत झालेल्या चर्चेची माहिती दिली. “हे काही गुपित नाही. मी त्यांना अलास्कामधील चर्चेबाबत सांगितले,” असे पुतिन म्हणाले. त्यांनी चीन दौऱ्याला “अत्यंत सकारात्मक” म्हटले आणि सांगितले की “सर्व सहभागी देशांनी स्वीकारलेली कागदपत्रे दूरदृष्टीपूर्ण असून भविष्यासाठी दिशादर्शक ठरतील.” भारतावर लावण्यात आलेल्या ५०% टॅरिफसंदर्भात विचारले असता, पुतिन म्हणाले, “आता साम्राज्यवादी युग संपले आहे. कोणीही कोणावर हावी होऊ शकत नाही.” ही गोष्ट त्यांनी बीजिंगमधील दियाओयूताई स्टेट गेस्टहाऊस येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली. त्यांनी कठोर इशारा देत सांगितले की जागतिक राजकारण किंवा सुरक्षेवर कोणताही देश वर्चस्व प्रस्थापित करू शकत नाही. त्यांनी असेही स्पष्ट केले की जरी भारत आणि चीनसारख्या “आर्थिक महासत्तां”चा उदय होत असला, तरी याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावर दबाव टाकावा किंवा शिक्षा स्वरूपात धोरणं लागू करावीत. पुतिन यांचा हा स्पष्ट संदेश थेट ट्रम्प आणि अमेरिकेला होता. ---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode