काबुल, 4 सप्टेंबर (हिं.स.)।अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे सतत झटके जाणवत आहेत. आज, गुरुवारी पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये 4.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, हा भूकंप 135 किलोमीटर खोलीवर आला.
एनसीएसने एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत सांगितले की, 4 सप्टेंबर 2025 रोजी, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10:40:56 वाजता, 34.38°N अक्षांश आणि 70.37°E रेखांशावर, 135 किमी खोलीवर अफगाणिस्तानमध्ये भूकंपाची नोंद झाली. त्याआधी, बुधवारी रात्री उशिरा 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्याची खोली फक्त 10 किलोमीटर होती. NCS च्या पोस्टनुसार, 3 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:53:44 वाजता, 36.86°N अक्षांश आणि 71.18°E रेखांशावर, 10 किमी खोलीवर भूकंप झाला. त्याचप्रमाणे, मंगळवारी दक्षिण-पूर्व अफगाणिस्तानात 5.5 तीव्रतेचा भूकंप झाला.
यापूर्वी, रविवारी रात्री जलालाबादमध्ये 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला होता.या भूकंपांमुळे आतापर्यंत 1,411 लोकांचा मृत्यू झाला असून, 3,250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रविवारी रात्री भूकंप झाला तेव्हा बहुतेक लोक झोपेत होते, त्यामुळे अनेकजण इमारतींच्या ढिगाऱ्याखाली अडकले.
हे उथळ भूकंप सहसा खोल भूकंपांपेक्षा अधिक धोकादायक ठरतात. कारण अशा भूकंपांमध्ये भूकंपीय तरंगांची जमिनीपर्यंत पोहोचण्याची अंतर कमी असते, ज्यामुळे जमिनीचे कंपन अधिक तीव्र होते आणि इमारतींना मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता वाढते.
अहवालानुसार, वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) ने अफगाणिस्तानमधील कुनार आणि नंगरहार प्रांतात आपत्कालीन मदत पाठवली आहे, जिथे 1,400 पेक्षा जास्त लोक मरण पावले आणि 3,000 हून अधिक जखमी झाले आहेत. प्राथमिक मदतीमध्ये अन्नसामग्री आणि उच्च ऊर्जा बिस्किटे समाविष्ट आहेत. अधिक मदत आणि कर्मचारी पाठवण्यासाठी अतिरिक्त उड्डाणांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
डब्ल्यूएफपी चे क्षेत्रीय संचालक हेराल्ड मॅनहार्ड्ट यांनी या आपत्तीची भयावहता सांगताना म्हटले, “घरे मलब्याखाली गडप झाली आहेत, रस्ते नष्ट झाले आहेत, सर्वत्र भूस्खलन झाले आहे आणि दुर्दैवाने अनेकांचे प्राण गेले आहेत.” त्यांनी सांगितले की, त्यांच्या टीम्स बचाव कार्यात गुंतल्या आहेत, आणि गरजा वाढल्यास त्यांचे अभियान वाढवण्यास तयार आहेत. मात्र बचाव कार्यात अडथळे येत आहेत, कारण रस्ते बंद आहेत, परिसर डोंगराळ आहे आणि सतत आफ्टरशॉक्स (भूकंपानंतरचे झटके) येत आहेत.
दरम्यान, भारतानेही अफगाणिस्तानला मदत पाठवली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी एक्सवर पोस्ट करत ही माहिती दिली. त्यांनी लिहिलं, “भारतीय भूकंप सहायता हवाई मार्गाने काबूलला पोहोचली आहे. आज 21 टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये कंबल, तंबू, स्वच्छता किट्स, पाण्याचे टाकी, जनरेटर, स्वयंपाक भांडी, पोर्टेबल वॉटर प्युरिफायर, स्लीपिंग बॅग, आवश्यक औषधे, व्हीलचेयर, हँड सॅनिटायझर, वॉटर प्युरिफिकेशन टॅबलेट्स, ओआरएस सोल्यूशन आणि इतर वैद्यकीय वापरातील साहित्य समाविष्ट आहे.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode