अमरावती, 4 सप्टेंबर (हिं.स.)सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने बुधवारी (दि.३) रात्री उशिरा बहुप्रतीक्षित २२ प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली. यामध्ये २१ प्रभाग चार सदस्यांचे तर एक ९ क्रमांकाचा एसआरपी वडाळी हा प्रभाग ३ सदस्यांचा राहणार आहे. एकूण २२ प्रभागातील ८७ सदस्यांच्या निवडीसाठी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. हरकतींसाठी १५ सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बुधवारला रात्री उशिरा प्रारुप प्रभाग रचना जाहिर होताच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
सर्वांनी आपापल्या मोबाईलवर तसेच सोईने आपापल्या प्रभागाच्या सीमारेषा तपासण्यावर जोर दिला आहे. एसआरपीएफ प्रभाग तीन सदस्य संख्येचा असणार एकूण २२ प्रभागातील ८७ सदस्यांच्या निवडीसाठी महापालिकेने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केल्यापैकी २१ प्रभाग हे चार सदस्य संख्येचे तर एक प्रभाग क्रमांक ९ आहे. पाच सदस्य संख्येचा एकही प्रभाग आस्तत्वात नाही. संबंधित सर्व प्रभागांची प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्यापूर्वी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्यांसह त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. प्रत्यक्षात, प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर कोणत्या प्रभागात यावेळी फेरबदल झाला आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसून आला.
दरम्यान, १५ सप्टेंबरपर्यंत हरकती, आक्षेप, सूचना दाखल करण्याची मुदत आहे. त्यानंतर दाखल झालेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुदतीत दाखल होणाऱ्या हरकतींची सुनावणी १६ ते २२ सप्टेंबर दरम्यानच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली केली जाणार आहे. त्यानंतर २३ ते २५ सप्टेंबरपर्यंत सुनावणीनंतर हरकती सूचनावरील शिफारशी विचारात घेवून प्राधिकृत अधिकारी यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागास सादर करण्यात येईल. २६ ते ३० सप्टेंबर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतीम केलेली प्रभाग रचना नगर विकास विभागाला राज्य निवडणूक आयोगास सादर करतील. त्यानंतर राज्य निवडणूक आयोग यांनी अंतिम केलेली प्रभाग रचना अधिसूचनेव्दारे संबंधित महापालिका आयुक्त ९ ऑक्टोबर १३ ऑक्टोबर २०२५ दरम्यान प्रसिद्ध करतील.
सन २०११ मध्ये झालेल्या जनगणने नुसार ६४७०५७ एवढ्या लोकसंख्येच्या आधारावर २२ प्रभागातून ८७ नगरसेवक निवडण्यात येणार आहे. यामध्ये एससी लोकसंख्या १११४३५ आणि एसटी १५९५५ एवढी लोकसंख्या आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी