नाशिक, 4 सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्राला सर्वच क्षेत्रात प्रगतीच्या शिखरावर नेणारे अष्टपैलू नेतृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, असे गौरवउदगार अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी काढले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या आरक्षणासंदर्भातील शासन निर्णयाचे स्वागत करताना नाशिकमधील भाजपा कार्यालय वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, हा निर्णय महाराष्ट्रातील मागास व दुर्बल घटकांच्या प्रगतीसाठी ऐतिहासिक ठरेल. ते पुढे म्हणाले की विकासकामे असोत, समाजातील प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असो, अथवा न्याय्य हक्क मिळवून देण्याचा विषय असो प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नेहमीच ठोस पावले उचलली आहेत. आरक्षणाबाबत काढलेला जी.आर. हा समाजघटकांना न्याय देणारा आणि तरुणांच्या शिक्षण व रोजगार क्षेत्रात नवी संधी निर्माण करणारा आहे.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “नरेंद्र पाटील यांनी ही आठवण करून दिली की मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पहिला मोर्चा स्वर्गीय अण्णासाहेब पाटील ह्यांनी मार्च १९८२ मध्ये काढला होता तत्कालीन सरकारने त्याला गांभीर्याने नाही घेतले. तसेच अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ हे समाजघटकांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करत आहे. आतापर्यंत ₹१३,००० कोटी रुपये इतके कर्ज बँका मार्फत दिले आणी त्यात ₹१२०० कोटी रुपये व्याज परतावा शासनाने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजींचा निर्णय आमच्या कामाला नवे बळ देणारा आहे. महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांनी या निर्णयाचे स्वागत करून राज्याच्या विकासासाठी एकत्र यावे.”
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला नरेंद्र पाटील यांचे स्वागत नाशिक महानगराध्यक्ष सुनील केदार यांनी शाल व श्रीफळ देऊन केले.
पत्रकार परिषदेला भाजपा नाशिक महानगर जिल्हाध्यक्ष सुनिल केदार , आमदार सिमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, भारतीय जनता पार्टी प्रदेश मुख्य सहप्रवक्ते अजित चव्हाण, नाशिक महानगर सरचिटणीससुनिल देसाई अमित घुगे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV