कॅनबेरा, 5 सप्टेंबर (हिं.स.)। ऑस्ट्रेलियाने २०२५च्या महिला एकदिवसीय विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे. बोर्डाने आज, शुक्रवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व मिचेल स्टार्क यांची पत्नी एलिसा हिली करणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना 1 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने महिला वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्या वर्ल्ड कप संघातील 15 पैकी 10 खेळाडू यंदाही स्क्वाडमध्ये समाविष्ट आहेत. एलिसा हेली, एलिस पेरी, बेथ मूनी यांसारखे सर्व स्टार खेळाडू यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही दिसणार आहेत. यात काहीच शंका नाही की ऑस्ट्रेलिया पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याची प्रबळ दावेदार मानली जात आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे निवड समिती सदस्य शॉन फेग्लर यांनी सांगितले, “भारतामध्ये वर्ल्ड कप खेळणे हे कोणत्याही संघासाठी सर्वात मोठं असाइनमेंट असतं. पण आम्हाला आमच्या संघावर या मोठ्या आव्हानासाठी पूर्ण विश्वास आहे. या स्क्वाडने अलीकडच्या उपखंडातील दौऱ्यांमध्ये आणि महिला प्रीमियर लीगमध्ये खेळून जे अनुभव मिळवले आहेत, त्याचा उपयोग त्यांना भारतातील कठीण खेळाच्या परिस्थिती समजून घेण्यासाठी नक्कीच होईल.”
ऑस्ट्रेलियन महिला संघ आपल्या वर्ल्ड कप स्पर्धेला न्यूझीलंडविरुद्ध 1 ऑक्टोबर रोजीच्या सामन्याने सुरुवात करणार आहे. त्यानंतर 4 ऑक्टोबरला त्यांचा सामना श्रीलंकेसोबत होईल. मग 8 ऑक्टोबरला ते पाकिस्तानविरुद्ध खेळतील. त्यानंतर 12 ऑक्टोबरला भारताविरुद्ध मोठा सामना रंगणार आहे. 16 ऑक्टोबरला महिला वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना बांग्लादेशशी होईल. त्यानंतर 22 ऑक्टोबरला इंग्लंड आणि 25 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडणार आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाची संपूर्ण टीम -एलिसा हिली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), अॅशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, एलेना किंग, फोबी लिचफिल्ड, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode