मुंबई, 5 सप्टेंबर (हिं.स.)। तारिणीचा हा ऍक्शन सीन टीव्हीवर पहिल्यांदाच अनुभवायला मिळणार आहे. आतापर्यंत तारिणीने हुशारी आणि धाडसीपणाने अनेक अंडरकव्हर ऑपरेशन्स यशस्वी पणे पार पाडले आहेत. तारिणीची पूर्ण टीम हे सीन्स शूट करताना अनेक अवघड प्रकरणांना सामोरे जाते. या गणेशोत्सवात तारिणीला एक नवी आणि अतिशय महत्वाची केस मिळाली आहे.
ती म्हणजे न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांची. चारुदत्त देसाई हे न्यायप्रिय, निर्भीड आणि नियमांच्या बाबतीत अत्यंत कडक असे मान्यवर न्यायमूर्ती आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे पण त्यांनी पोलिस संरक्षण नाकारलं कारण त्यांना वाटतं की, अशा धमक्या त्यांच्या कारकिर्दीत नवीन नाहीत. पण पोलिस विभाग चिंतेत आहे, कारण गणपतीत त्यांच्या घरी मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे धोका अधिक वाढू शकतो. म्हणून ही जबाबदारी तारिणीवर सोपवली जाते. तिच्या टीम मधले काही जण चारुदत्त देसाईच्या घरी गुप्तरीत्या प्रवेश करून त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडणार आहेत.
गणेश विसर्जनाचा दिवशी तारिणीला एक महत्त्वाची टीप मिळते की विसर्जन मिरवणुकीदरम्यानच न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांची हत्या होणार आहे. एकीकडे उत्सवात सामान्य माणसांना दुखापत न होण्याची काळजी घेणं आणि दुसरीकडे एका महत्वाच्या व्यक्तीचा जीव वाचवण्याची धडपड हे सर्व पाहणं प्रेक्षकांसाठीही थरारक ठरणार आहे. तारिणीची भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री शिवानी सोनार हिने या विशेष एपिसोडसाठी गायमुख मुंबई, येथे प्रत्यक्ष गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान शुटिंग केलं. याविषयी बोलताना शिवानी म्हणाली , रिअल लोकेशनवर शुट करणं खूपच आव्हानात्मक होतं. गर्दीत शूट करताना वेळेचं आणि सुरक्षेचं भान ठेवणं गरजेचं होतं. हा सीन शूट करणं अवघड होत पण आमची संपूर्ण टीम आणि दिग्दर्शक भीमराव मुडे सर यांची टीमसोबत केलेली प्लांनिंग खूप कमाल होती. प्रेक्षकांनी सिनेमामध्ये पाहिले असतील असे ऍक्शन सीन टीव्हीवर अनुभवायला मिळणार आहे.
शिवानी म्हणून मला गणपती विसर्जन पाहायला आवडत नाही कारण मला त्रास होतो, रडू येतं. पण हे विसर्जन शूट करताना खूप मजा आली. एक सकारात्मक गोष्ट ही कि प्रेक्षक तारिणीला ओळखत होते, भेटत होते, तारिणी म्हणून हाक मारत होते. त्यांनी दिलेलं प्रेम, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आमचं काम पाहून मिळणारी दाद हे सर्व खूप खास होतं. अभिनेते उमेश जगताप न्यायमूर्ती चारुदत्त देसाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हा गणेशोत्सव स्पेशल एपिसोड प्रेक्षकांसाठी एक भावनिक, थरारक आणि प्रेरणादायी अनुभव घेऊन येणार आहेत. एकीकडे भक्ती आणि दुसरीकडे कर्तव्य यांचा संगम कसा साधला जातो, हे 'तारिणी'च्या माध्यमातून पहायला मिळेल. तेव्हा बघायला विसरू नका 'तारिणी' सोम- शुक्र रात्री ९:०० वा. सदैव तुमच्या झी मराठीवर.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule