नवी दिल्ली, 6 सप्टेंबर (हिं.स.) टायगर श्रॉफच्या बहुप्रतिक्षित 'बागी ४' चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. जरी त्याचे शेवटचे काही चित्रपट चांगले काम करू शकले नसले तरी, हिट फ्रँचायझी 'बागी' च्या चौथ्या भागाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा होत्या. अखेर हा चित्रपट ५ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच दिवशी विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाइल्स' देखील मोठ्या पडद्यावर पोहोचला. पण 'बागी ४' ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आणि 'द बंगाल फाइल्स'ला जोरदार टक्कर देऊन मागे टाकले.
'बागी ४' ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुमारे १२ कोटी रुपयांचा उत्तम व्यवसाय केला. चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग जबरदस्त होते आणि बॉक्स ऑफिसवर येताच त्याने दुहेरी अंकी कमाई केली. 'द बंगाल फाइल्स'च नाही तर २०२५ मध्ये अजय देवगणच्या 'रेड २', 'जाट', 'सितारे जमीन पर', 'केसरी २' आणि 'भूल चुक माफ' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांनाही या चित्रपटाने जोरदार टक्कर दिली.
चित्रपटाच्या कथेतून असे दिसून येते की, टायगर श्रॉफचे पात्र रॉनी सात महिने कोमात राहिल्यानंतर शुद्धीवर येतो. तो शुद्धीवर येताच, त्या अपघातात आपल्या प्रेयसीला गमावल्याच्या दु:खाने तो उद्ध्वस्त होतो. पण त्याच्या आजूबाजूचे सर्वजण त्याला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतात की, त्याची कधीच प्रेयसी नव्हती आणि हे सर्व त्याचा गैरसमज आहे. चित्रपटाचा दुसरा भाग चाको (संजय दत्त) च्या प्रेमकथेवर केंद्रित आहे. पण समीक्षकांच्या दृष्टीने, हा चित्रपट फारसा प्रभावित करू शकला नाही.
'द बंगाल फाइल्स' ला बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार ओपनिंग मिळालेली नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने भारतात सुमारे १.७५ कोटी रुपयांची कमाई केली. सुरुवातीपासूनच हा चित्रपट वादांनी वेढला गेला होता. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये. कोलकाता येथे लाँचिंग दरम्यान, त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला नाही आणि चित्रपटाला राज्यातील कोणत्याही चित्रपटगृहात स्थान मिळाले नाही असे सांगितले जात आहे. अभिनेत्री पल्लवी जोशी यांनीही या संपूर्ण प्रकरणावर आक्षेप घेतला आणि भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून आपली चिंता व्यक्त केली.
'द बंगाल फाइल्स' हा भारतीय इतिहास आणि राजकारणाशी संबंधित सत्य घटनांवर आधारित एक काल्पनिक नाट्य चित्रपट आहे. ही कथा १९४० च्या दशकात पश्चिम बंगालमध्ये पसरलेल्या जातीय हिंसाचारावर केंद्रित आहे, ज्यामध्ये नोआखाली दंगलीचे भयानक परिणाम मोठ्या पडद्यावर दाखवले आहेत. मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर आणि पल्लवी जोशी सारखे दिग्गज कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत, तर दर्शन कुमार आणि सिमरत कौर मुख्य भूमिकेत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे