
छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)।जाधववाडी येथील बस डेपोमध्ये सुरू करण्यात आलेले चार्जिंग स्टेशनचे काम थांबले आहे. कंत्राटदाराने हे काम अर्धवट सोडून दिल्यामुळे काम थांबले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे आहे. शहराची सार्वजनिक वाहतुकीची गरज लक्षात घेऊन महापालिकेने 'स्मार्ट सिटी' च्या माध्यमातून शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी स्मार्ट सिटी मिशनच्या निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली. त्या तरतूदीतून शंभर बस खरेदी करण्यात आल्या. या सर्व बस डिझेलवर चालणाऱ्या बस आहेत. सिटीबसच्या ताफ्यात पर्यावरणपूरक बस असाव्यात अशी भूमिका समोर आल्यावर स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाने भाडेतत्वावर ई बस घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी हैदराबाद येथील एका एजन्सीशी करार करण्यात आला. एजन्सीकडून ३५ ई बस शहरात आणून त्या चालवण्यात येतील अशी घोषणा करण्यात आली. ३५ पैकी एक किंवा दोन बस पर्यटकांसाठी राखून ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. त्यापैकी एक बस प्रायोगिकतत्वावर शहरात दाखल झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रवासी या बसचा लाभ घेत आहेत. या बसचे चार्जीग एसटी महामंडळाच्या सौजन्याने करण्यात येत आहे. सर्वच्या सर्व ३५ ई बससाठी जाधववाडी येथील बसडेपोच्या परिसरात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय पालिकेसह स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार दीड ते दोन वर्षांपासून चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू करण्यात आले, परंतु या कामाने कधीच अपेक्षित गती पकडली नाही. अत्यंत संथगतीने चार्जिंग स्टेशनचे काम केले जात होते. चार्जिंग स्टेशनचे काम थांबल्यामुळे ई बस बद्दल पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis