
छत्रपती संभाजीनगर, 11 जानेवारी (हिं.स.)। आचारसंहिता संपताच छत्रपती संभाजी नगर येथील घाटी रुग्णालयात अनेक दशकानंतर एकाचवेळी नवीन ३५७ कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळणार आहेत. १३ जानेवारीपासून गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू होणार आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा फटका घाटीला वर्षानुवर्षे प्रत्येक ठिकाणी बसत आहे. त्यामुळेच कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. अर्थात, कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती राज्यातील इतर रुग्णालयांची होती. हे लक्षात घेऊन राज्यस्तरीय पातळीवर सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ही
भरती प्रक्रिया राज्यस्तरावर राबवण्यात येऊन आता उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार झाली आहे. १३ जानेवारीपासून गुणवत्ता यादीनुसार ५०-५० कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू होणार आहे. यातील पात्र उमेदवारांना आचारसंहिता संपताच ऑर्डर दिली जाईल व ऑर्डर दिलेल्या उमेदवारांना सेवेत रुजू होण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जाईल. ६९ वर्षांनंतर एकाचवेळी घाटीला एवढ्या मोठ्या प्रमाणात कायमस्वरुपी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मिळणार असल्याने घाटीच्या सेवेची गुणवत्ता आणखी उंचावेल, अशी अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis