रायगड - परिवर्तनाचा नारा देत महाविकास आघाडीचा प्रभाग ४,५,६ मध्ये जोशपूर्ण प्रचार
रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)। पनवेल महानगरपालिका निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने प्रचाराचा जोर वाढवला असून प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ मध्ये उत्स्फूर्त वातावरणात जोरदार प्रचार करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघा
परिवर्तनाचा नारा देत महाविकास आघाडीचा प्रभाग ४,५,६ मध्ये जोशपूर्ण प्रचार


रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)।

पनवेल महानगरपालिका निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने प्रचाराचा जोर वाढवला असून प्रभाग क्रमांक ४, ५ व ६ मध्ये उत्स्फूर्त वातावरणात जोरदार प्रचार करण्यात आला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडी समर्थित उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या.

महागाई, बेरोजगारी, पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि नागरी मूलभूत प्रश्नांवर महाविकास आघाडीने आपली भूमिका मांडली. महापालिकेत पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. जनतेकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जोश हा परिवर्तनाची दिशा दाखवणारा असल्याचे नेत्यांनी यावेळी सांगितले.

या प्रचार दौऱ्यात माजी आमदार तथा शिवसेना उपनेते सुरेन्द्रनाथ बाळ माने, माजी आमदार बाळाराम पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर प्रमुख अवचित राऊत, तालुका प्रमुख संदीप तांडेल यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

नेत्यांनी मतदारांना संबोधित करताना सांगितले की, पनवेल शहराचा समतोल आणि शाश्वत विकास साधण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सक्षम महापालिका घडवण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस पाठिंबा द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande