सुरक्षित वाहतुकीचा संदेश; इंडियाबुल्स सोसायटीत वाहतूक पोलिसांचा संवाद कार्यक्रम
रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)। पोलीस रेझिंग डे व रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ च्या अनुषंगाने नवीन पनवेल वाहतूक शाखेतर्फे इंडियाबुल्स सोसायटीतील रहिवाशांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढती वाहतूक कोंडी, अपघात
सुरक्षित वाहतुकीचा संदेश; इंडियाबुल्स सोसायटीत वाहतूक पोलिसांचा संवाद कार्यक्रम


रायगड, 10 जानेवारी (हिं.स.)।

पोलीस रेझिंग डे व रस्ता सुरक्षा अभियान–२०२६ च्या अनुषंगाने नवीन पनवेल वाहतूक शाखेतर्फे इंडियाबुल्स सोसायटीतील रहिवाशांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे प्रमाण आणि नियमांचे उल्लंघन लक्षात घेता नागरि कांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमात वाहतूक पोलिसांनी नागरिकांना हेल्मेट व सीटबेल्ट वापरण्याचे महत्त्व, वेगमर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन, मोबाईल वापरून वाहन न चालवणे, चुकीच्या पद्धतीने पार्किंग टाळणे तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सविस्तर माहिती दिली. रस्ता अपघात टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाहतूक नियम हे दंडासाठी नसून सुरक्षिततेसाठी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या मार्गदर्शन कार्यक्रमात पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार, पोलीस हवालदार संजय गावडे, जितेंद्र कदम, ज्ञानेश्वर वाघ यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. प्रत्यक्ष उदाहरणांच्या माध्यमातून नियम समजावून सांगत सुरक्षित वाहनचालनेचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला इंडियाबुल्स सोसायटीतील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे २०० पुरुष व महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला. रहिवाशांनीही पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही असे मार्गदर्शन कार्यक्रम राबवावेत, अशी मागणी केली. नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande