
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) - मुंबईच हीत जपायला आम्ही समर्थ आहोत, एकनाथ शिंदे मराठी नाही का, फडणवीस मराठी नाहीत का?. 20 वर्षापूर्वी एकत्र का नाही आलात, जेव्हा दोघं एकत्र यावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती, तेव्हा एकत्र आला नाहीत. आता, स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात, असा टोला शिवसेनेचे प्रमुखे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज महायुतीची जाहीर सभा मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीमधील प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे नाव घेत सभेला सुरुवात केली. शिवसेनेचं आणि शिवतीर्थचं अतुट नातं आहे, आजूबाजूला असलेल्या तिन्ही महापुरूषांच्या साक्षीने ही सभा होत आहे. ही प्रचारसभा नाही तर परिवर्तनाची सभा आहे, काल इथे सभा झाली त्यात टीका-टोमणे झाले. आम्ही त्यांना उत्तर देणार नाही, आम्ही कामाचा लेखाजोखा आणि पुढील 5 वर्षात काय करणार ते सांगणार आहे, असे म्हणत फक्त विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे, असे म्हटले.
काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो. इतर वेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हेच कळतं, यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता राज ठाकरेंवर शिवाजी पार्क मैदानातून टोला लगावला. मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उदयाही नाही. खऱ्या अर्थाने आजची सभा ही परिवर्तनाची नांदी आहे. आम्हाला भावनेचे नव्हे तर विकासाचे राजकारण करायचे आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि ती आर्थिक राजधानीसारखीच दिसायला हवी. पंतप्रधान मोदींचे व्हिजन घेऊन आपण पुढे जात आहोत. आपला अजेंडा हा फक्त विकास हाच असणार आहेे.
मराठी माणसाच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई राज्याचा मानबिंदू आहे. काही लोकांना निवडणूक आली की मराठी माणसाची आठवण येते. इतरवेळेस ते ढुंकूनही पाहत नाही. ‘पांच साल घर मै, चुनाव आया तो मुंबई खतरे मै’ मुंबईच्या आजच्या अवस्थेला हेच लोक जबाबदार आहेत. दिवसभर त्यांचे नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स अशी त्यांची भूमिका आहे. काही लोकं भावनिक भाषणे करतात, मराठी माणसाचे अस्तित्व संपेल अशी भाषा करतात. पण, कधीही असे होणार नाही. यांच्यामुळेच मुंबईतील मराठी माणूस बाहेर गेला. मराठी माणसाचे अस्तित्व धोक्यात नसून तुमचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचेही शिंदे म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी