
मुंबई, 12 जानेवारी (हिं.स.) - मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही तर तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. काही लोकांनी माझी नक्कल केली. नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली हे त्यांना समजायला हवे. महत्वाचे म्हणजे ही मुंबई कोणाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तुटू शकत नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई महापालिका प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज महायुतीची ऐतिहासिक शिवतीर्थावर भव्य सभा पार पडली. यावेळी शिवसेनेचे प्रमुखे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते.
आज तुम्हाला मराठी माणसावर संकट आले आहे असे वाटत आहे तर गेले 30 वर्षे तुम्ही नक्की काय केले? मला आव्हान देतात की आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे तुम्हाला मुलाला प्रमोट करायचे आहे. अरे बाबा जर आदित्यशीच चर्चा करायची असेल तर आमची उमेदवार शीतल गंभीर देखील पुरेशी आहे. आज मी खुले आव्हान देतो की, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरे येऊ देत , आमच्या शीतल गंभीर येतील. मग करूया चर्चा. हिन्दी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा सांगतो, या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची आहे.
महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण पुन्हा एकदा एकत्र आलो आहोत. आज स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. त्यांनी हिंदू संस्कृती आणि भगवा झेंडा जगात नेला. कधी कधी मी विचार करतो इतक्या सभा घेण्याची गरज आहे. पण माझ्यासाठी तो संवाद असतो. काही गोष्टी या संवादापेक्षा वेगळ्या संवादात बोलावं लागतो. मी त्यांच्याच शब्दात सांगतो, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओ लावले. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे कधी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत असलेले तसेच उद्धव ठाकरे हेदेखील राज ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करत असल्याचे दाखवण्यात आले. ठाकरे बंधूंची सत्तेसाठी बनवाबनवी चालू आहे, असे फडणवीस यांना या व्हिडीओतून दाखवायचे होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी