
अमरावती, 12 जानेवारी (हिं.स.)। श्रीहरिकोटा येथून भारताच्या अंतरिक्ष प्रवासात आणखी एक ऐतिहासिक पान जोडले गेले आहे. भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्रोने पीएसएलवी-सी६२/ईओएस-एन१ मोहिमेअंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) यांनी विकसित केलेल्या अतिगोपनीय हायपरस्पेक्ट्रल निगराणी उपग्रह ‘अन्वेषा’चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
सकाळी १०.१८ वाजता सतीश धवन अंतरिक्ष केंद्रावरून उड्डाण घेतलेल्या पीएसएलवीच्या ६४व्या मोहिमेत एकूण १५ उपग्रह सोबत नेण्यात आले होते आणि त्यातील सर्वात महत्त्वाचा उपग्रह म्हणजे भारताच्या सुरक्षा सामर्थ्याला नवी उंची देणारा ‘अन्वेषा’. हा उपग्रह शत्रू ठिकाणांचे अचूक मॅपिंग, अत्यंत उच्च दर्जाची प्रतिमा निर्मिती आणि सूक्ष्म हालचालींवर नजर ठेवू शकणाऱ्या तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
या मोहिमेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भारतीय खासगी अंतरिक्ष क्षेत्राने पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला असून देशातील अंतरिक्ष तंत्रज्ञानाच्या खाजगीकरणाला नवे बळ मिळाल्याचे मानले जात आहे. पीएसएलवी-सी६२ रॉकेटद्वारे ईओएस-एन१ आणि इतर सहउपग्रहांना सूर्य-तुल्यकालिक कक्षेत स्थापित करण्यात येत आहे, ज्यामुळे कोणत्याही हवामानात स्थिर व अचूक माहिती मिळू शकणार आहे.
‘अन्वेषा’मध्ये बसवण्यात आलेली हायपरस्पेक्ट्रल तंत्रज्ञान प्रणाली ही या मोहिमेची खरी ताकद मानली जात आहे. सामान्य सॅटेलाइट केवळ दृश्य प्रतिमा टिपतात, मात्र हायपरस्पेक्ट्रल सेन्सर प्रकाशातील अशा सूक्ष्म तरंगलांबी पकडू शकतो, ज्या मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. त्यामुळे जंगलांच्या दाट भागात लपलेली हालचाल असो किंवा रणांगणातील अतिशय छोटी वस्तू, या उपग्रहाच्या नजरेतून काहीही सुटणार नाही.
प्रत्यक्षात ही तंत्रज्ञान प्रणाली सामान्य सॅटेलाइटला जणू गुप्तहेर कॅमेऱ्यात रूपांतरित करते. भारताच्या संरक्षण क्षमतेला मजबुती देणारे हे प्रक्षेपण यशस्वी झाल्याने देशाच्या सुरक्षाव्यवस्थेला आधुनिक, अचूक आणि वेगवान आकाशनजर मिळाली असून भविष्यातील युद्धतंत्र, सीमासुरक्षा आणि गुप्तचर व्यवस्थेत मोठा बदल घडवू शकणारी ही ऐतिहासिक कामगिरी मानली जात आहे. श्रीहरिकोटाच्या भूमीवरून पुन्हा एकदा भारताने जगाला आपल्या अंतरिक्ष सामर्थ्याची जाणीव करून दिली असून इस्रो आणि डीआरडीओच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारताची अंतरिक्षसत्ता अधिक मजबूत आणि आत्मनिर्भर होत असल्याचे चित्र या प्रक्षेपणाने समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule