

* हिंदु जनजागृती समिती व राष्ट्रभक्त अधिवक्ता समितीने घेतली शंकराचार्यांची भेट
पुणे, १२ जानेवारी (हिं.स.) : ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतरा’ची वाढती प्रकरणे ही भारतीय संस्कृती, सनातन धर्म आणि हिंदुस्थानला कमकुवत करण्यासाठी आखलेले एक नियोजित षड्यंत्र असल्याचे प्रतिपादन द्वारका शारदा पीठाधीश्वर श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती महाराज यांनी केले आहे.
पुणे येथे वेदाचार्य घैसासगुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भागवत कथेचे भावरसमय निरूपण केले. त्यानिमित्ताने ‘हिंदु जनजागृती समिती’ आणि ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या अधिवक्त्यांनी शंकराचार्यांची भेट घेतली. त्यांनी वरील मार्गदर्शन केले.
या संकटाचा ऐतिहासिक संदर्भ देताना त्यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे ‘ईस्ट इंडिया कंपनी’ व्यापाराच्या निमित्ताने भारतात आली आणि कपटाने देशाला गुलाम बनवून २०० वर्षे राज्य केले, तसेच काहीसे संकट आज छद्म रूपाने धर्मांतराच्या माध्यमातून उभे ठाकले आहे. आज भारताचे संरक्षण मंत्रालय आणि लष्करी सामर्थ्य इतके प्रबळ आहे की कोणताही देश आपल्यावर थेट आक्रमण करण्याचे धाडस करू शकत नाही, म्हणूनच विशिष्ट लोकसंख्या वाढवून देशाला अंतर्गतरीत्या दुर्बल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनी स्पष्ट केले की, धर्मांतर आणि लव्ह जिहादचा हा प्रकार केवळ धार्मिक नसून राजकीय वर्चस्व मिळवण्याची एक दूरगामी योजना आहे. लोकशाहीत बहुमत हाच सत्तेचा आधार असतो. त्यामुळे हिंदूंची संख्या कमी करणे आणि स्वतःची लोकसंख्या वाढवणे हा एक सुनियोजित कट आहे, जेणेकरून भविष्यात मताधिकाराच्या जोरावर शासन व्यवस्था आपल्या हातात घेता येईल. याचप्रमाणे ख्रिश्चन मिशनरीसुद्धा ‘सेवे’चे माध्यम वापरून प्रलोभने देऊन सामान्य हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. या षड्यंत्राला पायबंद घालण्यासाठी शंकराचार्यांनी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने सुद्धा ‘लव्ह जिहाद’विरोधात अत्यंत कठोर कायदा करावा, अशी आग्रही मागणी केली आहे.
ज्याप्रमाणे अल्पसंख्याकांना त्यांच्या मदरसा आणि चर्चमध्ये धर्मशिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य आहे, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्रालय आणि मानव संसाधन मंत्रालयाने शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये हिंदू मुलांना ‘हिंदु धर्मशिक्षण’ अनिवार्य करावे, असे विधान त्यांनी केले. जर मुलांना शालेय जीवनापासूनच आपल्या धर्माचे आणि संस्कारांचे ज्ञान मिळाले, तर ते कोणत्याही प्रलोभनाला किंवा षड्यंत्राला बळी पडणार नाहीत. सर्व राजकीय पक्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रप्रेमी संस्थांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून एकत्र यावे, असे आवाहनही शंकराचार्यांनी केले.
श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य यांनी समितीच्या कार्याला आशीर्वाद देऊन हिंदु जनजागृती समिती खूप चांगले कार्य करत आहे, असे म्हटले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी