
धर्मशाळा, 12 जानेवारी (हिं.स.)। येथील सोलन जिल्ह्यातील अर्की बाजार येथे रविवारी उशिरा भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली. या आगीत आठ वर्षांच्या मुलीचा जिवंत जळून मृत्यू झाला असून आठ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि चार मुलांचा समावेश असून संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बाजारातील एका निवासी घरातून आगीची सुरुवात झाली आणि काही वेळातच ज्वाळांनी आसपासची घरे व दुकाने वेढली. दरम्यान अनेक एलपीजी सिलिंडर फुटल्याने आग आणखी भडकली आणि स्फोटांच्या आवाजाने बाजारपेठेत खळबळ उडाली. आग इतकी वेगाने पसरली की काही कुटुंबांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही.
सूचना मिळताच अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली आणि अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तथापि, तोपर्यंत सहा घरे आणि अनेक दुकाने पूर्णतः जळून खाक झाली होती, तर लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार संजय अवस्थी यांनीही घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की आग रात्री सुमारे अडीचच्या सुमारास भडकली आणि आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू असून ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अर्की बाजार आणि परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी बाधित कुटुंबांसाठी तातडीने मदत, नुकसानभरपाई आणि सुरक्षित पुनर्वसनाची मागणी केली आहे. प्रशासनाने घटनेची चौकशी करून पीडितांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule