
मुंबई, 13 जानेवारी (हिं.स.)। ‘ऐकस लि.’चे व्यवस्थापकीय संचालक राजीव कौल यांना कंपनीचे सह-संस्थापक म्हणून कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. कंपनीच्या उत्पादन कार्याची सुरुवात झाल्यापासून ऐकसच्या वाढीमध्ये आणि विकासात कौल यांनी दिलेल्या मूलभूत व मोलाच्या योगदानाची दखल घेत हा सन्मान त्यांना देण्यात आला आहे.
‘ऐकस लि.’चे संस्थापक तसेच कार्यकारी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मल्लिगेरी यांनी सांगितले, “ऐकस लि. ही कंपनी उभारण्यात राजीव यांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. ते कंपनीचे कायमस्वरूपी भागीदार आहेत. त्यांनी तळागाळापासून नेतृत्व करत प्रत्येक आव्हानाला समर्थपणे तोंड दिले आणि कंपनीच्या दीर्घकालीन दृष्टीकोनाला साकार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या योगदानाशिवाय आजची ‘ऐकस लि.’ उभीच राहू शकली नसती. त्यांना ‘ऐकस लि.’चे सह-संस्थापक म्हणून मान्यता देणे, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
भारतामधील पहिली एकात्मिक एअरोस्पेस उत्पादन परिसंस्था उभारण्यासाठी राजीव यांनी अथक परिश्रम घेतले. कोप्पल टॉय क्लस्टर (केटीसी) उभारण्यातही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. तसेच हुबळी ड्युरेबल गुड्स क्लस्टर (एचडीसी) येथे ग्राहक उत्पादन परिसंस्थेच्या विकासाचे नेतृत्व करत, विशेषतः ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात, ‘ऐकस’च्या प्रवेशाला त्यांनी दिशा दिली. याशिवाय, ‘ऐकस’च्या संयुक्त उपक्रमांच्या संचालक मंडळांवरही राजीव कौल कार्यरत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule