
रत्नागिरी, 13 जानेवारी, (हिं. स.) : अग्रणी जिल्हा व्यवस्थापक कार्यालय (बँक ऑफ इंडिया) तर्फे आयोजित बँकर्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत बँक ऑफ इंडियाला विजेतेपद प्राप्त झाले.
बँक ऑफ इंडियाचे आंचलिक प्रबंधक नरेंद्र रघुनाथ देवरे व उप आंचलिक प्रबंधक अंजनी कुमार सिंह आज़ाद यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंबे येथील सोसा क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्या वर्षी बँक ऑफ इंडिया संघाने विजेतेपद पटकावले. ॲक्सिस बँक संघ उपविजेता, तर फेडरल बँक संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये बँक ऑफ इंडिया संघाचे कर्णधार संकेत सकपाळ यांना उत्कृष्ट फलंदाज, बँक ऑफ इंडिया संघाचे रोहित सुर्वे यांना उत्कृष्ट गोलंदाज, बँक ऑफ इंडिया संघाचे अजय प्रताप यांना स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (मॅन ऑफ द टूर्नामेंट), तर ॲक्सिस बँक संघाचे संदीप ऊर्फ सँडी यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन दत्ताराम कानसे उपस्थित होते. यावेळी बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक शुभम सिन्हा व निशांत राज निशू, ॲक्सिस बँकेचे जिल्हा समन्वयक नितीन पावसकर, फेडरल बँकेचे जिल्हा समन्वयक योगेश सावंत, तसेच सोसा क्रिकेट अॅकॅडमीचे मालक केतन सावंत उपस्थित होते.
स्पर्धेत बँक ऑफ इंडिया, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, आयडीबीआय बँक व ॲक्सिस बँक अशा एकूण १३ बँकांच्या संघांनी सहभाग घेतला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी