
परभणी, 13 जानेवारी, (हिं.स.)। परभणी महानगरपालिका निवडणूकीसाठी गुकूवार १५ जानेवारी रोजी मतदान केलेल्या नागरिकांना परभणी येथील गुरुमाऊली आयुर्वेद येथे १०० टक्के तपासणी शुल्क माफ करून मोफत आरोग्य तपासणी देण्यात येणार आहे. मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावरील शाई व मतदानानंतरचा फोटो किंवा मतदान कार्ड सादर केल्यानंतर नागरिकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी मतदान करणाऱ्या नागरिकासाठी मोफत आरोग्य तपासणी होणार आहे. मतदार जनजागृती अभियानांतर्गत महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढावा व लोकशाही अधिक सक्षम व्हावी, या उद्देशाने “My Vote My Parbhani” हा एक सामाजिक व प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम डॉ. संदीप चव्हाण, डॉ. मुंजाभाऊ गोरे, डॉ. महेश इप्पर, डॉ. ईश्वर दुधाटे तसेच गुरुमाऊली आयुर्वेदचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी आयुक्त नितीन नार्वेकर यांना स्वीप प्रमुख प्रा. गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
हा उपक्रम कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, केवळ मतदार जनजागृती करणे, नागरिकांची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करणे व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग वाढविणे हा यामागील शुद्ध सामाजिक उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा व आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आपले मत आपली परभणीचे संयोजक डॉ. संदीप चव्हाण यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis