वाचनामुळे माणूस वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतो - राजेंद्र गहाळ
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। समृद्ध वाचनालये ही गावाची भूषण असतात. ग्रंथांच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासारख्या महान स्त्रियांचे आणि महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचणे आवश्यक आहे. वाचनामुळे माणूस वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतो,
वाचनामुळे माणूस वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतो - राजेंद्र गहाळ


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। समृद्ध वाचनालये ही गावाची भूषण असतात. ग्रंथांच्या माध्यमातून राष्ट्रमाता जिजाऊ यांच्यासारख्या महान स्त्रियांचे आणि महापुरुषांचे विचार घराघरात पोहोचणे आवश्यक आहे. वाचनामुळे माणूस वैचारिकदृष्ट्या समृद्ध होतो, असे प्रतिपादन ग्रामीण कथाकार, कोंडी, दोन एकर, पोशिंदा या कथासंग्रहांचे लेखक राजेंद्र गहाळ यांनी केले.

शेंद्रा येथील श्रीमती भागीरथी त्र्यंबकराव ढगे सार्वजनिक वाचनालयास लेखक गहाळ यांच्यावतीने सुमारे 15 हजार रुपये किमतीचे 101 ग्रंथ भेट देण्यात आले. हे वाचनालय प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे यांनी स्वखर्चाने सुरू केले आहे. भेट देण्यात आलेल्या ग्रंथांमध्ये बालसाहित्य, कथा, कादंबर्‍या, महापुरुषांची चरित्रे व आत्मचरित्रे, कवितासंग्रह तसेच वैचारिक ग्रंथांचा समावेश आहे. या ग्रंथभेटीमुळे शेंद्रा गावातील वाचकांसाठी वाचनाची मोठी पर्वणी उपलब्ध झाली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजेंद्र गहाळ यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक त्र्यंबकराव ढगे यांच्या हस्ते गहाळ यांचा सातारा येथे संपन्न झालेल्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कथाकार म्हणून सहभाग घेतल्याबद्दल यथोचित सत्कार करण्यात आला.

त्र्यंबकराव ढगे यांनी ग्रंथालयास अमूल्य ठेवा दिल्याबद्दल राजेंद्र गहाळ यांचे आभार मानले. ते म्हणाले की, राजेंद्र गहाळ हे संवेदनशील व दर्जेदार साहित्यनिर्मिती करणारे साहित्यिक असून ग्रामीण भागात साहित्य चळवळ वाढावी यासाठी स्वतः खर्च करून प्रयत्न करणारे कार्यकर्ते आहेत. साहित्यिक, सुशिक्षित व समाजशील नागरिकांनी ग्रंथालय समृद्ध करण्यासाठी त्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन ढगे यांनी केले, तर आभार सौ. आरती ढगे यांनी मानले.

दरम्यान, कथाकार राजेंद्र गहाळ हे परभणी येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात अध्यापनाचे कार्य करतात. ते उत्तम कथाकार, कथाकथनकार व व्याख्याते आहेत. दोन एकर, कोंडी, पोशिंदा हे त्यांचे कथासंग्रह प्रकाशित झाले असून महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पालकोल, भोकरीचा मळा व जावई शोध हे ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांनी अनेकदा कथाकथन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande