स्वामी विवेकानंदांचा हिमालयातील प्रवास प्रेरणादायी - डॉ. दत्तात्रय मगर
परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। स्वामी विवेकानंदांनी हिमालयात केलेला प्रवास अतिशय महत्वपूर्ण आहे. अल्मोड्याच्या काकडीघाटात एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि या घटनेने त्यांना ''उत्तिष्ठ भारत'' (उठा, भारत) ची प्र
स्वामी विवेकानंदांचा हिमालयातील प्रवास प्रेरणादायी


परभणी, 13 जानेवारी (हिं.स.)। स्वामी विवेकानंदांनी हिमालयात केलेला प्रवास अतिशय महत्वपूर्ण आहे. अल्मोड्याच्या काकडीघाटात एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करताना त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि या घटनेने त्यांना 'उत्तिष्ठ भारत' (उठा, भारत) ची प्रेरणा दिली असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.दत्तात्रय मगर यांनी केले.

विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा परभणी आणि निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.मगर यांचे 'स्वामी विवेकानंदांचा हिमालयातील प्रवास' या विषयावर व्याख्यान झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

परभणीतील निरामय योग प्रसार व संशोधन केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.आप्पाराव शेळके हे होते. याप्रसंगी विवेकानंद केंद्राचे देवगिरी विभाग प्रमुख शेखर दीक्षित, परभणी शाखाध्यक्ष डॉ.उत्तमराव वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.मगर यांनी सांगितले की,स्वामी विवेकानंदांना अवघे ३९ वर्षाचे आयुष्य लाभले. हिमालय हा त्यांच्या अत्यंत आवडीचा असल्याने नैनीताल, अल्मोडा, ऋषिकेश, हरिद्वार यांसारख्या पवित्र स्थळांना भेटी दिल्या, तिथे त्यांनी गहन ध्यान, साधना आणि आध्यात्मिक अनुभव घेतले, विशेषतः अल्मोड्याच्या काकडीघाटात त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील विचारांना आणि कार्याला नवी दिशा मिळाली. तसेच त्यांनी अनेक साधू-संतांची भेट घेऊन रामकृष्ण परमहंसांच्या शिकवणीचा प्रसार केला.

लोहाघाट (चंपावत) जवळ त्यांनी मायावती अद्वैत आश्रम स्थापन केला, जो आजही प्रसिद्ध आहे आणि जिथे ते अनेकदा थांबले. या प्रवासात ते अनेक साधक आणि संतांना भेटले. परमहंसांच्या शिकवणीचा आणि वेदांताचा प्रसार केला. त्यांच्या या हिमालयातील भटकंतीने त्यांना पश्चिमेकडील प्रवासासाठी तयार केले. हिमालयातील शांतता आणि निसर्गाने त्यांना आत्मचिंतन व आत्म-साक्षात्कार करण्यास मदत केली. या प्रवासाने त्यांना भारताच्या आध्यात्मिक सामर्थ्याची आणि एकात्मतेची जाणीव करून दिली. हा प्रवास त्यांच्या भावी कार्यासाठी, विशेषतः शिकागो धर्म परिषदेतील भाषणासाठी, एक महत्त्वाचा आधार ठरला, असेही डॉ.मगर यांनी नमूद केले.

प्रास्ताविक शेखर दीक्षित यांनी केले. २५ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान विवेकानंद केंद्रातर्फे समर्थ भारत पर्व साजरे करण्यात आल्याचे सांगून त्यांनी केंद्रामार्फत संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ.शेळके यांनी अध्यक्षीय समारोप करताना स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲड.मयूर साळापूरकर तर आभार प्रदर्शन गंगाधर पवार यांनी केले. कार्यक्रमास डॉ.शरद रामढवे, डॉ.अनिल दिवाण यांच्यासह निरामय योग केंद्राचे पदाधिकारी व विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या मायावती अद्वैत आश्रमाला भेट देण्याची संधी डॉ.दत्तात्रय मगर यांना ऑक्टोबर महिन्यात मिळाली. त्याठिकाणी दोन दिवसात मिळालेल्या अनुभवाविषयी त्यांनी सांगितले तसेच ज्या पिंपळाच्या झाडाखाली बसून स्वामीजींनी ध्यान साधना केली त्या वृक्षाचे सोबत आणलेले पान त्यांनी उपस्थितांना दाखवले. त्या काळात स्वामीजींनी केलेल्या कठीण प्रवासाचे वर्णन करत त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थळाची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande