
अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) – अमरावती महापालिका निवडणुकीसाठी आता अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपलं आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बहुजन समाज पार्टी आणि युवा स्वाभिमानसह सर्व प्रमुख पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. 16 जानेवारीला निकाल येण्यापूर्वीच संपूर्ण शहर निवडणुकीच्या उकाड्यात आहे, आणि सर्व पक्षांचे नेते स्वतःच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत आहेत.
विकास हाच केंद्रबिंदू – राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानपरिषद सदस्य संजय खोडके म्हणाले, “अमरावती महापालिकेतील 87 जागांपैकी 85 जागांवर आमचे उमेदवार असून दोन जागांवर शिवसेनेसोबत युती आहे. प्रचारात कोणताही उमेदवार फक्त स्वतःसाठी नव्हता; शहर, प्रभाग आणि सामाजिक-धार्मिक विकासावर भर देऊन काम केले आहे. अजित पवार यांच्या अमरावती दौऱ्यानेही सकारात्मक परिणाम दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अमरावतीचा मागासलेपणा दूर करण्यासाठी पुढाकार घेईल.”
सुरक्षित आणि सुंदर अमरावती – काँग्रेस
काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, “मागील सत्ताधाऱ्यांनी शहराची अवस्था बिकट केली आहे; भूमाफिया, कचरा माफिया आणि अवैध ड्रग्ज यांचा वाढता प्रभाव याचे द्योतक आहे. काँग्रेस पक्ष शिस्तबद्ध काम करत असून शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. सुरक्षित आणि सुंदर अमरावतीसाठी 'पंजा' या चिन्हावर मतदान करा.”
भाजपाचा विश्वास – पन्नासपेक्षा जास्त जागा जिंकणार
भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. नितीन धांडे म्हणाले, “सर्व प्रभागांमध्ये जोरदार प्रचार झाला असून मोठ्या सभा, घराघर संपर्क आणि मिरवणुकींमुळे भाजपसाठी सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. मागील तीन चार दिवसांत भाजपाची स्थिती अधिक भक्कम झाली असून स्वबळावर पन्नासपेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आम्हाला विश्वास आहे. भाजप महापालिकेत महापौर देखील स्वबळावर बनवेल.”
बसपाची निर्णायक भूमिका
बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजय गोंडाणे म्हणाले, “बसपाचे 32 उमेदवार निवडणूक रिंगणात असून काही प्रभागात पक्षाचं पूर्ण पॅनल विजयी होण्याची दाट शक्यता आहे. विकासाच्या मुद्द्यावर जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. सत्तेसाठी बसप मोठ्या प्रमाणात योगदान देईल.”
अमरावती महापालिकेतील 87 जागांसाठी सर्व पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रचार केला असून, विकास, सुरक्षा आणि शहराच्या स्वच्छतेसारखे मुद्दे नागरिकांच्या निर्णयात महत्त्वाचे ठरत आहेत. 16 जानेवारीला येणाऱ्या निकालासाठी शहराचे लक्ष लागले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी