
रत्नागिरी, 14 जानेवारी, (हिं. स.) : आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि जागतिक आध्यात्मिक गुरू परमपूज्य श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत रत्नागिरीत २२ जानेवारीला ‘भक्ती उत्सव’ महासत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार असलेल्या या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.
सोहळ्यात श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान, ध्यान आणि सुश्राव्य संगीताचा त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे. दैनंदिन जीवनातील ताणतणाव दूर करून मनाला शांती देणारा हा कार्यक्रम रत्नागिरीतील आध्यात्मिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरेल. रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी आर्ट ऑफ लिव्हिंग परिवारातर्फे करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी